मुंबई- 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez ) अंतरिम जामिन मिळाला असला तरी तिच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) तुरुंगातून वकिलाला पत्र लिहित जॅकलिन निर्दोष असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच त्याने जॅकलिन आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता. आता जॅकलिनच्या वकिलाने सुकेशच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘जॅकलिन याप्रकरणी निर्दोष आहे आणि ती तिच्या सन्मानासाठी लढेल’, असं वकिलाने स्पष्ट केलं.
मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने जॅकलिनच्या जामिनाला विरोध केला होता. जॅकलिनने चौकशीत सहकार्य केलं नाही, जेव्हा पुरावे समोर सादर केले तेव्हाच तिने प्रतिक्रिया दिली, असं ईडीने कोर्टासमोर म्हटलं. तर दुसरीकडे जॅकलिनला माझ्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा होती, असं सुकेशने त्याच्या पत्रात म्हटलंय. त्याच्या या पत्राची गंभीर दखल घेतली जावी अशी मागणी जॅकलिनचे वकील प्रशांत पाटील यांनी केली आहे.
“जर ते पत्र सुकेश चंद्रशेखरने लिहिलं असेल तर या प्रकरणाची नीट चौकशी केली जावी. ईडीने स्वतंत्रपणे याचा तपास करावा. सुकेशने जे काही पत्रात म्हटलंय, त्या आधारावर पुढील चौकशी व्हावी. त्याचा जबाब नोंदवून घ्यावा”, असं प्रशांत पाटील ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
“सत्य सर्वांसमोर यावं, हेच कोणत्याही तपासाचं मूळ उद्दिष्ट असतं. जर आरोपीकडून काही गोष्टींचा खुलासा झाला असेल तर यंत्रणांनी त्याचा तपास करावा. जॅकलिन निर्दोष आहे आणि तिच्या सन्मानासाठी शेवटपर्यंत लढणार आहे”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
‘जॅकलिनने माझ्याकडून कधीच काही मागितलं नाही. मी तिच्यावर प्रेम करावं आणि नेहमी तिच्यासोबत राहावं, एवढीच तिची अपेक्षा होती. मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून तिला भेटवस्तू दिल्या होत्या. कोर्टासमोर मी या सर्व गोष्टी सिद्ध करेन’, असं सुकेशने त्याच्या पत्रात म्हटलंय.