नवी दिल्ली: तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचे जबाब नोंदवले गेले आहेत. या दोघींनी सुकेश आणि त्याची सहकारी पिंकी ईराणीवर गंभीर आरोप केले आहेत. पिंकीच्या मदतीनेच सुकेश लोकांना फसवतो असा खुलासा जॅकलिन आणि नोराने केला आहे. जॅकलिनने तिच्या जबाबात म्हटलंय, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली.”
सुकेशने पिंकी ईराणीमार्फत जॅकलिनशी संपर्क साधला होता. सुकेश हा गृहमंत्रालयाशी संबंधित असून तो सरकारसाठी काम करतो, अशी खोटी ओळख तिने जॅकलिनला करून दिली होती. इतकंच नव्हे तर “तो सन टीव्हीचा मालक आहे आणि जयललिता यांच्या कुटुंबीयांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तुझा तो खूप मोठा चाहता आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील बरेच प्रोजेक्ट्स त्याने तुझ्यासाठी आणले आहेत”, असं सांगून तिची जॅकलिनची फसवणूक केली होती.
खंडणी प्रकरणाविषयी जॅकलिन पुढे म्हणाली, “सुकेश कॉल आणि व्हिडीओ कॉलद्वारे माझ्याशी संपर्कात होता. दिवसातून दोन ते तीन वेळा आम्ही बोलायचो. सकाळी शूटिंगच्या आधी तो मला कॉल करायचा. व्हिडीओ कॉलमध्ये त्याच्या मागे नेहमी पडदे लावलेले असायचे, त्यामुळे तो तुरुंगातून बोलतोय हे मला समजलं नाही.”
“सुकेशने मला सांगितलं होतं की तो त्याच्या प्रायव्हेट जेटने प्रवास करतो. जेव्हा मी केरळमध्ये गेली होती, तेव्हा त्याने मला प्रायव्हेट जेट दिला होता. केरळमध्ये त्याने माझ्यासाठी हेलीकॉप्टर राइडचीही व्यवस्था केली होती. चेन्नईत मी फक्त दोनदा त्याला भेटले होते”, असं जॅकलिनने स्पष्ट केलं.
जॅकलिनच्या मते तिची आणि सुकेशची शेवटची भेट 8 ऑगस्ट 2021 रोजी झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना संपर्क केला नव्हता. नंतर जॅकलिनला समजलं की सुकेशला अटक करण्यात आली आहे. “पिंकी आणि शेखर या दोघांनी माझी फसवणूक केली. मला धोका दिला. मला जेव्हा त्याच्या क्रिमिनल बॅकग्राऊंडविषयी समजलं, तेव्हा पहिल्यांदाच मला त्याचं खरं नाव सुकेश असल्याचं समजलं. पिंकीला सर्वकाही माहीत होतं, पण तिने कधीच मला सांगितलं नव्हतं”, असे आरोप जॅकलिनने केले.
जॅकलिनसोबत नोरा फतेहीनेही तिचा जबाब नोंदवला आहे आणि तिनेही सुकेशवर गंभीर आरोप केले आहेत. सुकेशने नोराला एक मोठं घर आणि आलिशान आयुष्य देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्या बदल्यात त्याला नोरा गर्लफ्रेंड म्हणून हवी होती.
“एका कार्यक्रमात माझी लीना नावाच्या महिलेशी ओळख झाली. सुकेश कोण आहे, हे मला तेव्हा माहीत नव्हतं. माझा त्याच्याशी कोणताच संपर्क झाला नव्हता. मी त्याची गर्लफ्रेंड बनल्यास तो मला सर्व सोयीसुविधा देणार, असं मला पिंकीने सांगितलं होतं. मला ईडीने जेव्हा नोटीस बजावली, तेव्हा मला सुकेशचं सत्य समजलं”, असं नोराने सांगितलं.