जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दु:खाचा डोंगर; आईच्या निधनाने खचली अभिनेत्री
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जॅकलिनची आई किम फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. 24 मार्च रोजी त्यांना स्ट्रोक आल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिची आई किम फर्नांडिसचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या रुग्णालयात दाखल होत्या. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. किम यांना हार्ट स्ट्रोक आला होता आणि त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. आई रुग्णालयात असताना जॅकलिन पूर्ण वेळ त्यांची देखभाल करत होती. 24 मार्च रोजी किम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी जॅकलिनला लिलावती रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले.
जॅकलिन आयपीएलमध्ये परफॉर्म करणार होती. 26 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामनादरम्यान गुवाहाटीमध्ये ती परफॉर्म करणार होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच आईची प्रकृती बिघडल्याने ती आयपीएलमध्ये परफॉर्म करायला गेली नाही. जॅकलिनच्या आईची तब्येत बिघडल्याचं समजताच अभिनेता सलमान खानसुद्धा त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचला होता. सलमान आणि जॅकलिन यांच्यात चांगली मैत्री आहे. या दोघांनी ‘रेस 3’, ‘राधे’, ‘किक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. लॉकडाऊनच्या काळात जॅकलिन सलमानच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये राहत होती.




View this post on Instagram
2022 मध्येही किम यांना स्ट्रोक आला होता आणि त्यावेळी बहरीन इथल्या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जॅकलिनची आई बहरीनमधील मनामा इथं राहत होत्या. त्यांची पार्श्वभूमी बहुसांस्कृतिक असून त्यांना मलेशियन आणि कॅनेडियन वारसा आहे. तिचे आजोबा कॅनेडियन होते, तर तिचे पणजोबा गोव्यातील होते.
जॅकलिनने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘अलादीन’ या चित्रपटात तिने अभिनेता रितेश देशमुखसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘हाऊसफुल 2’, ‘मर्डर 2’, ‘किक’, ‘ब्रदर्स’, ‘ढिशूम’, ‘जुडवा 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. काही दिवसांपूर्वी तिचा ‘फतेह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये तिने सोनू सूदसोबत स्क्रीन शेअर केला होता.