रजनीकांत यांच्या ‘जेलर’मधील अभिनेत्याला मंदिरात दिला नाही प्रवेश; कारण आलं समोर
विनायकन हा केवळ अभिनेताच नाही तर तो संगीतकार आणि पार्श्वगायकसुद्धा आहे. त्याने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलंय. 1995 मध्ये मात्रिकम या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार अभिनेता विनायकनला केरळमधील एका मंदिरात प्रवेश नाकारला गेला. पलक्कड इथल्या कल्पथी मंदिरात विनायकनला नकार दिल्यानंतर त्याचा मंदिरातील स्थानिक लोकांसोबत वाद झाला. स्थानिकांसोबत वाद घालतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी आता मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी विनायकनला प्रवेश नाकारण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. त्याचप्रमाणे काही लोक विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. “विनायकन यांना मंदिरात प्रवेश नाकारला होता. त्यांच्यावर कोणतीच बंदी घातली नव्हती. पण मंदिरात असलेल्या स्थानिकांनी सांगितलं की विनायकन हे रात्री 11 वाजल्यानंतर दर्शनासाठी आले होते. पण त्यांच्याशी कोणताच वाद झाला नव्हता,” असं वॉर्ड काऊन्सिलर सुभाष म्हणाले.
मंदिराच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण
पलक्कडमधील कल्पथी मंदिर हे सकाळी पाच वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत रोज सर्वसामान्यांसाठी खुलं असतं. विनायकनला जेव्हा कल्पथी मंदिरा दर्शनासाठी आला, तेव्हा त्याला मंदिरात जाऊ दिलं नव्हतं. या घटनेवरून स्थानिकांसह काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत, असं सुभाष यांनी सांगितलं. याविषयी ते पुढे म्हणाले, “मंदिरात काही काम सुरू होतं. त्यावेळी मंदिरात असलेले लोक विनायकन यांना ओळखू शकले नव्हते, कारण त्यांनी टोपी घातली होती. माझ्या मते जेव्हा त्यांना विचारलं गेलं की ते कोण आहेत, तेव्हा त्यांना राग आला.”
यामुळे मंदिरात दिला नाही प्रवेश
रात्री मंदिर बंद झाल्यानंतर विनायकन दर्शनासाठी पोहोचला होता. उशिरा रात्री त्याने मंदिरात प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मंदिर परिसरात असलेल्या स्थानिकांनी त्याला रात्री 11 वाजल्यानंतर आत प्रवेश दिला नाही. यामुळे विनायकन आणि स्थानिकांमध्ये थोडी बाचाबाची झाली. त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विनायकन बोलताना दिसतोय की, तो तिथे देवाच्या दर्शनासाठी आला होता.
याआधीही विनायकन वादाच्या भोवऱ्यात
याआधीही विनायकन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. मद्यधुंद अवस्थेत पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात रजनीकांत यांचा दमदार अभिनय आणि ॲक्शन पाहायला मिळाला. तर दुसरीकडे खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विनायकनने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं. विनायकन याने चित्रपटात वर्मन या खलनायकाची भूमिका साकारली होती. ज्या पद्धतीने विनायकन याने वर्मनची भूमिका साकारली, त्यामुळे त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली. विनायकन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.