Jailer | ‘जेलर’च्या व्हिलेनचीही जोरदार चर्चा; ज्याला रजनीकांतमुळे मागावी लागली 10 रुपयांची भीक
रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर आपली विशेष छाप सोडली आहे. खलनायक साकारणाऱ्या विनायकन यांच्याविषयी जाणून घेऊयात..
मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. आता हा ॲक्शनपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रजनीकांत यांचा दमदार अभिनय आणि ॲक्शन पाहायला मिळाला. तर दुसरीकडे खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. अभिनेते विनायकन यांनी चित्रपटात वर्मन या खलनायकाची भूमिका साकारली आहे. ज्या पद्धतीने विनायकन यांनी वर्मनची भूमिका साकारली, त्यामुळे त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळत आहे. विनायकन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आता जेलरच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेलर हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला आहे.
‘जेलर’च्या विलेनची चर्चा
विनायकन हे केवळ अभिनेतेच नाही तर ते संगीतकार आणि पार्श्वगायकसुद्धा आहेत. त्यांनी मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलंय. 1995 मध्ये मात्रिकम या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र 2016 मध्ये कमातीपद्म या चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड मिळाला. हा अवॉर्ड त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या विभागात मिळाला. त्यांनी या चित्रपटातील एक गाणंसुद्धा संगीतबद्ध केलं होतं. 2016 मधल्या या चित्रपटामुळे त्यांना इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली. त्यानंतर आता रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटाने त्यांच्या करिअरची दिशा आणि दशा बदलली.
रजनीकांत-विनायकन यांचा सीन
जेलरचे वर्मन म्हणजेच अभिनेते विनायकन हे लवकरच कासरगोल्ड आणि करीनतंडन या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. त्यापैकी कासरगोल्ड हा ॲक्शनपट आहे. यामध्येही त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. जेलरबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी रजनीकांत यांच्यासोबत दमदार काम केलं. एका सीनमध्ये रजनीकांत विलेन वर्मनकडून भीक मागवून घेतात. हा सीन चित्रपटातील अत्यंत दमदार सीनपैकी एक मानला जातोय. चाहत्यांनाही हा सीन खूप आवडला. जेलर या चित्रपटाचं दिग्दर्शन दिलीप नेल्सन कुमार यांनी केलं आहे. या चित्रपटाने जवळपास 600 कोटी रुपयांची कमाई केली आहे.