देशातील सर्वांत श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बुधवारी अंबानी कुटुंबीयांकडून ‘मामेरू’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांनी. अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमाला जान्हवी आणि शिखर हे पारंपरिक गुजराती पोशाखात दिसले. यावेळी जान्हवीने स्लीव्हलेस ब्लाऊज आणि नारंगी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर शिखरने नीळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला होता. पापाराझींनी या दोघांचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
मामेरू समारंभ ही लग्नापूर्वीची गुजराती परंपरा आहे. या समारंभात वधूचे मामा तिला मिठाई आणि भेटवस्तू देतात. या भेटवस्तूंमध्ये सामान्यत: पनेतर साडी, दागिने, आयव्हरी किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या, मिठाई आणि सुका मेवा यांचा समावेश असतो. वधूच्या लग्नापूर्वी कौटुंबिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा समारंभ आयोजित केला जातो. मामेरू समारंभ केवळ विवाहसोहळ्याच्या सांस्कृतिक समृद्धीतच भर घालत नाही तर वधू आणि तिच्या कुटुंबाला भावनिक आधार आणि आनंददेखील प्रदान करतो.
अनंत आणि राधिका यांनी 19 जानेवारी 2023 रोजी मुंबईत गोल धना परंपरेनुसार साखरपुडा केला. त्यानंतर मार्च महिन्यात जामनगरमध्ये तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहाना, पंजाबी आणि बॉलिवूड गायक दिलजित दोसांज, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी परफॉर्म केलं होतं. जामनगरमधील या सेलिब्रेशननंतर अंबानी कुटुंबीयांनी त्यांच्या पाहुण्यांना आलिशान क्रूझवर नेलं होतं. अनंत हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत असल्याची गोष्ट जगजाहीर आहे. या दोघांनी माध्यमांसमोर कधीच जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. तुझं ‘सपोर्ट सिस्टिम’ कोण आहे, असा प्रश्न विचारला असता तिने क्षणाचाही विलंब न करता शिखरचं नाव घेतलं होतं. “किशोरवयात असल्यापासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो. आमची स्वप्नं एकमेकांना माहित आहेत,” असं ती म्हणाली होती. शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे.