तुमच्या फोटोची किंमत जास्त असेल तर..; जान्हवीकडून पापाराझींची पोलखोल
जिम, रेस्टॉरंट, कॅफे.. सेलिब्रिटी कुठेही असले की पापाराझी त्यांच्या मागोमाग पोहोचतात. खासगी आयुष्यातही मोकळा वेळ मिळत नसल्याने अनेक सेलिब्रिटी या पापाराझींवर राग व्यक्त करताना दिसतात.
गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. एखाद्या सेलिब्रिटीचा पाठलाग केला जातो आणि त्यांचे फोटो, व्हिडीओ क्लिक केले जातात. सेलिब्रिटी जिममध्ये असो, पार्लरमध्ये किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये.. पापाराझी त्यांचे कॅमेरे घेऊन त्याठिकाणी अचूक वेळी पोहोचतात. अनेकदा हे सेलिब्रिटीच पापाराझींना फोटो क्लिक करण्यासाठी बोलावतात, अशी टीका नेटकऱ्यांकडून होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री जान्हवी कपूरने पापाराझींची ‘मोडस ऑपेरेंडी’ सांगितली आहे. ते कशाप्रकारे काम करतात आणि सेलिब्रिटींची किंमत कशी ठरवली जाते, याविषयी तिने पोलखोल केली आहे.
‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला पापाराझी कल्चरविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “सध्या माझ्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं प्रमोशन सुरू आहे. त्यामुळे माझे फोटो क्लिक करण्यासाठी त्यांना एअरपोर्टवर बोलावलं जातंय. पण जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसतं किंवा मी शूटिंगला जात नसते, मला कॅमेरासमोर यायचं नसतं, तेव्हा त्यांना थोडी अधिक मेहनत घ्यायची असेल तर कारचाही पाठलाग करतात. माझ्यासोबत हे अनेकदा घडलंय. त्यांना प्रत्येक फोटोसाठी पैसे मिळतात, त्यामुळे ते कारचा पाठलाग करून येतात. प्रत्येक सेलिब्रिटीचा एक रेशन कार्ड असतो. त्यांचे फोटो विकले तर त्यांना खूप पैसे मिळतात. जर तुमची किंमत अधिक असेल तर ते स्वत: तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुमच्या गाडीचा पाठलाग करतात. जर तुमच्या फोटोंना तेवढी किंमत नसेल, तर तुम्हाला पापाराझींना बोलवावं लागतं.”
View this post on Instagram
जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. या प्रमोशननिमित्त दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये ती मोकळेपणे व्यक्त होतेय. या मुलाखतींमध्ये जान्हवी तिच्या खासगी आयुष्याविषयी व्यक्त झाली. एका मुलाखतीत जान्हवीने मुलाविषयीचा एक किस्सा सांगितला. जान्हवीच्या रुममधून खिडकीद्वारे बाहेर पडताना एका मुलाला वडील बोनी कपूर यांनी पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी जान्हवीच्या खिडकीला ग्रील लावून घेतली होती. जान्हवी हळूच त्या मुलाला खिडकीतून बाहेर पाठवत होती. मात्र तितक्यात तिच्या वडिलांनी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे सर्व पाहिलं होतं. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने हा किस्सा सांगितला.