सुशीलकुमार शिंदेंच्या नातूसोबत जान्हवी लग्न करणार? अभिनेत्रीने दिलं उत्तर
जान्हवी कपूर गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करतेय. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये जान्हवीने अप्रत्यक्षरित्या तिच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला होता.
अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये जान्हवी तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करतेय. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आणि स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या जान्हवी म्हणाली, “मी नुकतीच अशी बातमी वाचली की माझं लग्न लवकरच होणार आहे. मी माझ्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला आहे. लोकं दोन-तीन आर्टिकल्सचं मिश्रण करून म्हणतात की मी लग्न करणार आहे. इतकंच काय तर ते आठवड्याभरात माझं लग्न लावायला तयार आहेत. ते तयार असले तरी मी अद्याप तयार नाही (हसते). मला सध्या काम करायचं आहे. या सर्व चर्चा मूर्खपणाच्या आहेत.”
जान्हवीने याआधीही तिच्या लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. एका पापाराझी पेजवर तिच्या लग्नाविषयीची पोस्ट शेअर करण्यात आली होती. तिरुपती बालाजी मंदिरात जान्हवी शिखर पहाडियाशी लग्न करणार असल्याची ही पोस्ट होती. त्यावर कमेंट करत जान्हवीने प्रतिक्रिया दिली होती. ‘काहीही..’ अशी कमेंट तिने केली होती.
View this post on Instagram
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत असल्याची गोष्ट जगजाहीर आहे. या दोघांनी माध्यमांसमोर कधीच जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली नाही. मात्र आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. तुझं ‘सपोर्ट सिस्टिम’ कोण आहे, असा प्रश्न विचारला असता तिने क्षणाचाही विलंब न करता शिखरचं नाव घेतलं होतं. “किशोरवयात असल्यापासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो. आमची स्वप्नं एकमेकांना माहित आहेत,” असं ती म्हणाली होती.
“मी 15-16 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्नं ही नेहमीच त्याची स्वप्नं राहिली आहेत आणि त्याची स्वप्नं ही नेहमीच माझी आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय, अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो”, अशा शब्दांत जान्हवी व्यक्त झाली होती.