मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या शिखर पहाडिया या तिच्या खास मित्राला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने तिच्या डेटिंग लाइफबद्दल काही खुलासे केले आहेत. आई श्रीदेवी तिच्या काही गोष्टींबाबत कशा पद्धतीने प्रोटेक्टिव्ह होती आणि आता त्याच गोष्टी ती वडील बोनी कपूर यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने अनुभवते, हे तिने सांगितलं. त्याचसोबत बॉलिवूडने प्रेमाबद्दलच्या तिच्या कल्पनांना नवा आकार कसा दिला, याबद्दलही जान्हवी व्यक्त झाली. आपल्या लव्ह-लाइफविषयी पालकांसोबत प्रामाणिक राहिल्यास आयुष्य कसं सोपं होतं, हेदेखील तिने सांगितलं.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कुशा कपिलाच्या ‘स्वाइप राइड विथ टिंडर’ या शोमध्ये जान्हवी कपूरने हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने सांगितलं की जेव्हा श्रीदेवी यांना समजलं की जान्हवी एका मुलाला डेट करतेय, तेव्हा त्या थेट तिच्या शाळेत पोहोचल्या होत्या. ती म्हणाली, “एका मुलाचं माझ्यावर प्रेम आहे हे जेव्हा तिला समजलं तेव्हा मम्मी थेट माझ्या शाळेत आली. शाळेत येऊन तिने माझ्या शिक्षकांकडे त्याची तक्रार केली. मी माझ्या मुलीला शाळेत हे सर्व करायला पाठवलं नाही, असं तिला म्हणायचं होतं.”
“बॉलिवूडमुळे प्रेमाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन काहीसा बदलला. पण हे पूर्णपणे तुमच्या मानसिकतेवर आणि तुमच्या आयुष्यात असणाऱ्या लोकांवर अवलंबून असतं. जर एखादी व्यक्ती माझ्यासाठी तितका विचार करत नसेल किंवा तितके प्रयत्न करत नसेल तर त्या व्यक्तीबद्दल मी दोनदा विचार करेन. प्रेम हे काही फास्ट फूड नाही”, असंही जान्हवी म्हणाली.
या मुलाखतीत जान्हवी तिच्या पहिल्या सीरिअस रिलेशनशिपविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. ते नातं फार काळ का टिकलं नाही, याचंही कारण तिने सांगितलं. ती पुढे म्हणाली, “माझा पहिला सीरिअस बॉयफ्रेंड हा माझ्याच वयाचा होता आणि आम्ही खूप लपूनछपून एकमेकांना भेटायचो. त्या प्रेमाची गोष्टच वेगळी होती. पण दुर्दैवाने ते नातं फार काळ टिकलं नाही, कारण मला खूप खोटं बोलावं लागत होतं. माझ्या आईवडिलांचा अशा गोष्टींना फार विरोध होता. तुझा बॉयफ्रेंड असू शकत नाही, असं ते म्हणायचे.”
“तेव्हा मला हे समजून चुकलं होतं की आईवडिलांची परवानगी असणं आणि त्यांना मोकळेपणे सर्व सांगणं यांमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या निर्णयांवर खूप आत्मविश्वास जाणवतो”, असा अनुभव जान्हवीने सांगितलं.