‘तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते’; जावेद अख्तर भडकले
ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. 'गद्दाराचा मुलगा' अशी टीका करणाऱ्या युजरला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. अमेरिकेतील निवडणुकीबद्दल अख्तर यांनी एक ट्विट केलं होतं.
ज्येष्ठ पटकथालेखक आणि गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येतात. सोशल मीडियावरील ट्रोलिंगलाही ते सडेतोड उत्तर देताना दिसतात. नुकतंच एका युजरने त्यांच्यावर ‘गद्दाराचा मुलगा’ अशी टीका केली. जावेद अख्तर यांनी संबंधित युजरला फटकारत त्यांचे कुटुंबीय 1857 च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा भाग असल्याचं सांगितलं. अख्तर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या शक्यतेवर ट्विट केलं होतं. त्यांच्या याच ट्विटवरून युजरने त्यांच्यावर ‘गद्दाराचा मुलगा’ अशी टीका केली होती.
काय होतं जावेद अख्तर यांचं ट्विट?
‘भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तो अभिमान असेल. पण जो बायडेन यांच्यात आणि माझ्यात एक समान गोष्ट आहे. आम्हा दोघांना अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष बनण्याची समान संधी आहे’, असं ट्विट अख्तर यांनी केलं होतं. त्यावर एका युजरने त्यांच्यावर टीका केली. ‘आमच्या राष्ट्राची विभागणी करणारा गद्दाराचा मुलगा’ अशा शब्दांत त्याने अख्तर यांना ट्रोल केलं. विविध मुद्द्यांवर आपली मतं बिनधास्तपणे मांडणाऱ्या अख्तर यांनीसुद्धा संबंधित युजरला सडेतोड उत्तर दिलं. ‘तुम्ही पूर्णपणे अज्ञानी आहात की पूर्ण मुर्ख आहात, हे ठरवणं कठीण आहे’, अशा शब्दांत त्यांनी फटकारलं.
यापुढे त्यांनी लिहिलं, ‘1857 पासून माझं कुटुंब स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत आहे आणि त्यासाठी त्यांनी तुरुंगवास आणि काळ्या पाण्याची शिक्षासुद्धा भोगली आहे. तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रज सरकारचे तळवे चाटत होते.’
जावेद अख्तर हे गीतकार आणि कवी जान निसार अख्तर यांचे पुत्र आहेत. अख्तर यांचे वडील फाळणीपूर्वीच्या ब्रिटिशांच्या काळात भारतातील प्रगतीशील लेखक चळवळीत सक्रिय सहभागी होते. तर त्यांचे आजोबा फझल-ए-हक खैराबादी हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध 1857 च्या बंडात भाग घेतला होता. खैराबादी यांना अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तिथेच त्यांचं 1864 मध्ये निधन झालं.
I am a proud Indian citizen and till my last breath I will remain so but I have one common fact with Joe Biden . Both of us have exactly equal chance of becoming the next president of USA .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 6, 2024
अमेरिकेतील निवडणुकांबद्दल केलेल्या याच ट्विटमध्ये अख्तर यांनी असंही लिहिलं आहे, ‘अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा या आगामी निवडणुकीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बायडेन यांच्या रिपब्लिकन विरोधकांपासून युएसएला वाचवू शकतात.’