नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राज्यसभेतही त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची झलक पहायला मिळते. अनेकदा त्यांना रागावल्याचंही पहायला मिळालं. मंगळवारी पुन्हा एकदा राज्यसभेत जया बच्चन यांचा पारा चढला. एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला. यानंतर राज्यसभेत असा मुद्दा उठला की तेलुगू चित्रपट RRR ला दाक्षिणात्य चित्रपट किंवा भारतीय चित्रपट म्हणून लेबल लावणं योग्य आहे का? यावर जया बच्चन यांनी बेधडकपणे उत्तर दिलं.
जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलायला सुरुवात केली तेव्हा एका खासदाराने त्यांना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्या आणखी नाराज झाल्या आणि म्हणाल्या “अरे नीरज.. सारखं मधे-मधे काय?” मात्र उपराष्ट्रपती जगदीप धनखडने जया बच्चन यांचं कौतुक करत म्हणाले, “मॅडम, तुमचा आवाज नाही बुलंद आवाज आहे.”
यानंतर जया बच्चन यांनी ऑस्करमध्ये भारताला मिळालेल्या दोन्ही पुरस्कारांबद्दल शुभेच्छा दिल्या. “फिल्म इंडस्ट्रीतील लोक हे या देशातील सर्वांत महत्त्वपूर्ण राजदूत आहेत. मग ते उत्तर, पूर्व, दक्षिण किंवा पश्चिमेकडून का असेनात.. ते सर्व भारतीय आहेत”, असं त्या म्हणाल्या.
क्षेत्रीय राजकारण करणाऱ्यांनाही त्यांनी यावेळी टोला लगावला. “मला आनंद आहे की आपण इथे देशातील सर्वांत महत्त्वपूर्ण राजदूतांबद्दल, जे फिल्म इंडस्ट्रीतून आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा करत आहोत. ज्या फिल्म इंडस्ट्रीने अनेकदा देशाची मान अभिमानाने उंचावली, तिथून आल्याने मी याठिकाणी अत्यंत गर्वाने उभी आहे. मी एस. एस. राजामौली यांना खूप चांगल्याप्रकारे ओळखते. लेखक के. वी. विजयेंद्र प्रसाद हे केवळ लेखकच नाही तर ते कथाकार आहेत. ते राज्यसभेचे सदस्यसुद्धा आहेत. आपल्यासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब आहे”, असं त्या म्हणाल्या.
‘नाटू नाटू’ने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ट्विट करत टीमचं कौतुक केलं. मात्र हे ट्विट करताना त्यांनी ‘तेलुगू गाणं आणि तेलुगू झेंडा’ अशा शब्दांचा उल्लेख केल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे. गायक अदनान सामीने ट्विट करत त्यांच्यावर टीका केली. ‘छोट्याशा तलावातल्या बेडकाच्या विचारासारखीच ही गोष्ट झाली, जो त्याच्या छोट्या नाकामुळे विशाल समुद्राचा विचार करू शकत नाही. राष्ट्रीय अभिमान किंवा सन्मान पाहू न शकल्याने आणि अशा पद्धतीचं क्षेत्रीय विभाजन केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, असं अदनानने लिहिलं आहे.