माधुरी दीक्षितला प्रॉस्टिट्यूट म्हणणाऱ्यावर भडकल्या जया बच्चन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
कुणाल नायरच्या या कमेंटनंतर माधुरी आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांचा पारा चढला आहे. अशा अपमानकारक शब्दांचा वापर करणं चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. यामुळे मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे.
मुंबई : ‘बिग बँग थिअरी’ या हॉलिवूडच्या प्रसिद्ध शोवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची अत्यंत वाईट पद्धतीने तुलना करण्यात आली. याप्रकरणी राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांनी हा शो स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे. या शोमध्ये माधुरी दीक्षितवर केलेली कमेंट अत्यंत अपमानकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. याप्रकरणी आता ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणाल नायरवर त्या भडकल्या असून त्याला मनोरुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला आहे.
जया बच्चन यांची प्रतिक्रिया
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “हा कुणाल नायर वेडा आहे का? त्याची जीभ खूप घाणेरडी आहे. त्याला मनोरुग्णालयात पाठवलं पाहिजे. हा प्रश्न तर त्याच्या कुटुंबीयांना विचारलं पाहिजे की त्यांना ही टिप्पणी कशी वाटली?” यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. “मी तो एपिसोड पाहिला नाही, त्यामुळे मी त्यावर फार काही बोलू शकत नाही. पण जर हे खरं असेल तर त्यातून त्यांची तुच्छ मानसिकता दिसून येते. ही गोष्ट त्यांना मस्करी कशी वाटू शकते”, असं त्या म्हणाल्या.
नेमकं काय आहे प्रकरण?
नुकताच नेटफ्लिक्सवर ‘बिग बँग थिअरी’चा नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या सिझनच्या या एपिसोडमध्ये जिम पार्सन्सने शेल्डन कूपरची भूमिका साकारली आहे. तो माधुरी आणि ऐश्वर्या यांची तुलना करताना दिसतो. ‘ऐश्वर्या ही गरीबांची माधुरी दीक्षित आहे’, असं तो म्हणतो. यानंतर कुणाल नायर पुढे म्हणतो, “ऐश्वर्या राय ही देवीसारखी होती आणि तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित लेपरस प्रॉस्टिट्यूट (कुष्ठरोगी वेश्या) आहे.”
नेटफ्लिक्सला नोटीस
कुणाल नायरच्या या कमेंटनंतर माधुरी आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांचा पारा चढला आहे. अशा अपमानकारक शब्दांचा वापर करणं चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. यामुळे मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे. या एपिसोडमध्ये त्यांनी महिलांप्रती नीच भावनेला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्यांनी म्हटलंय.