Taarak Mehta | धक्कादायक! ‘तारक मेहता..’मधील ‘मिसेस रोशन सोढी’चा निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप
हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचंही तिने स्पष्ट केलं. या घटनेनंतर 24 मार्च रोजी सोहैल यांनी जेनिफरला नोटीस बजावली. 4 एप्रिल रोजी जेनिफरने त्यांना व्हॉट्सॲपवर उत्तर दिलं.
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी काही दिवसांपासून मालिकेचा निरोप घेतला. यावेळी त्यांनी निर्मात्यांवर मानधन थकवल्याचाही आरोप केला. त्यानंतर आता गेल्या 15 वर्षांपासून मालिकेशी जोडली गेलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. जेनिफरने या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारली आहे.
मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर हिने निर्माते असितुकमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरोधात कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तिने मालिकेसाठी शूटिंग करणं बंद केलं आहे. 7 मार्च रोजी तिने शेवटचं शूटिंग केलं. सोहैल आणि जतिन यांच्यापासून अपमान झाल्यानंतर सेटवरून निघाल्याचं जेनिफरने सांगितलं.
नेमकं काय घडलं?
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने संपूर्ण घटना सांगितली. “हे सगळं 7 मार्च रोजी घडलं. माझ्या लग्नाचा वाढदिवस आणि होळी एकाच दिवशी होती. मी सेटवरून निघताना मला सोहैल आणि जतिन यांनी कारमागे उभं राहून मला थांबवण्याचा प्रयत्न केला. मी या शोमध्ये 15 वर्षे काम केलं आहे, त्यामुळे ते मला अशा पद्धतीने बळजबरीने थांबवू शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यावेळी सोहैलने मला धमकी दिली. त्यामुळे मला असितकुमार मोदी, सोहैल रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची केस दाखल करावी लागली.”
7 मार्च रोजी हाफ डे घेणार असल्याचं तिने आधीच निर्मात्यांना सांगितलं होतं. मात्र हाफ डे न दिल्याने किमान दोन तास तरी ब्रेक द्या, अशी विनंती तिने केली होती. वारंवार विनंती करूनही त्यांनी परवानगी न दिल्याची तक्रार जेनिफरने केली. सेटवर त्यांनी भेदभाव केल्याचाही आरोप तिने केला. “ते प्रत्येकाची विनंती ऐकतात, पण माझी नाही. मी त्यांच्याकडे विनंती करत राहिली. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. पुरुष कलाकारांसाठी त्यांनी नेहमीच समजून घेतलं. मालिकेचं सेट हे पूर्णपणे पुरुषप्रधान आहे. सोहैल माझ्याशी उद्धटपणे वागला आणि त्याने मला सेटवर चार वेळा हाकलून लावण्याची धमकी दिली. नंतर कार्यकारी निर्माते जतिन यांनी माझी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला”, असं ती पुढे म्हणाली.
हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचंही तिने स्पष्ट केलं. या घटनेनंतर 24 मार्च रोजी सोहैल यांनी जेनिफरला नोटीस बजावली. 4 एप्रिल रोजी जेनिफरने त्यांना व्हॉट्सॲपवर उत्तर दिलं. लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर जेनिफरविरोधात निर्मात्यांनी पैसे उकळण्यासाठी नोटीस बजावल्याचा आरोप केला. अखेर 8 एप्रिल रोजी जेनिफरने असित मोदी, सोहैल रमाणी आणि जतिन बजाज यांना नोटीस बजावली.