अभिनेत्रीची दोन वर्षांच्या मुलीसमोर गोळी झाडून हत्या; कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पतीला अटक
अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणात नवं वळण; पोलिसांनी पतीला केली अटक, हायवेवर नेमकं काय घडलं?
हावडा: अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. याप्रकरणी हावडा पोलिसांनी आज (गुरुवार) सकाळी पती प्रकाश कुमारला अटक केली. बागनान इथल्या NH-16 हायवेवर रियाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. प्रकाशच्या जबाबात सतत विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. 30 वर्षीय रिया ही पती आणि दोन वर्षीय मुलीसोबत झारखंडहून कोलकाताला जात होती. त्यावेळी महिश्रेखा ब्रीजजवळ दरोडेखोरांनी त्यांची गाडी थांबवली. दरोडेखोरांनी रियावर गोळी झाडल्याची माहिती प्रकाशने पोलिसांना दिली. मात्र कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकाशला अटक केली.
हायवेवर नेमकं काय घडलं?
झारखंडहून कोलकाताला जात असताना बुधवारी पहाटे 6 वाजता काही दरोडेखोरांनी रियाची गाडी थांबवली. यावेळी गाडीत रिया, तिचा पती प्रकाश आणि दोन वर्षांची मुलगी होती. पतीला वाचवण्यासाठी रिया गाडीतून उतरली आणि त्यावेळी दरोडेखोरांनी तिच्यावर गोळी झाडली. रियाच्या कानाजवळ त्यांनी पॉईंट ब्लँक रेंजने गोळी झाडली आणि तिथून पळ काढला, अशी माहिती तिच्या पतीने पोलिसांना दिली.
या घटनेनंतर प्रकाशने तीन किलोमीटरपर्यंत गाडी चालवून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पिर्ताला परिसरातील काही स्थानिकांनी अखेर त्याची मदत केली आणि पोलिसांना बोलावलं. रियाला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्हीची तपासणी करत आहेत. तसंच गोळीचे काही अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
रियाच्या कुटुंबीयांचा प्रकाशवर आरोप
प्रकाशनेच रियाच्या हत्येची सुपारी दिली असा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकाश रियाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. रिया त्याच्यापेक्षा अधिक लोकप्रिय होत असल्याने आणि अधिक पैसा कमवत असल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले, असं कुटुंबीयांनी म्हटलंय.
कोण होती रिया कुमारी?
रिया ही झारखंडमधील अभिनेत्री आणि युट्यूबर आहे. सोशल मीडियावर ती इशा आयला या नावाने प्रसिद्ध आहे. तिचा पती प्रकाश हा चित्रपट निर्माता आहे.