कुठे हाऊसफुल? आमच्या इकडं तर काळं कुत्रं… म्हणणाऱ्याला ‘झिम्मा 2’च्या दिग्दर्शकाचं भन्नाट उत्तर
'झिम्मा 2' या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोज हाऊसफुल आहेत. अशातच दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या एका फोटोवर नेटकऱ्याने खोचक कमेंट केली. त्यावर हेमंतनंही त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे.
मुंबई : 6 डिसेंबर 2023 | स्त्री मनाचे विविध कवडसे उलगडत जाणारा आणि सात मैत्रिणींची भन्नाट कथा सांगणारा ‘झिम्मा 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून ‘झिम्मा’च्या सीक्वेलची प्रेक्षकांना खूप आतुरता होती. म्हणूनच चित्रपट प्रदर्शित होताच अनेक ठिकाणी थिएटरबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकले. अशाच एका हाऊसफुल शोचा फोटो दिग्दर्शक हेमंत ढोमेनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र एका युजरच्या कमेंटने हेमंतचं लक्ष वेधलं. ‘झिम्मा 2’च्या हाऊसफुल शोबाबत प्रश्न निर्माण करणाऱ्या या नेटकऱ्याला हेमंतने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे.
हेमंतने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्याच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर, शिवानी सुर्वे, सायली संजीव आणि क्षिती जोग पहायला मिळत आहेत. थिएटरच्या तिकिट काऊंटरवर ते हाऊसफुलचा बोर्ड घेऊन आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं कौतुक केलं. ‘सर खूप मस्त आहे चित्रपट, कुठेही कंटाळा आला नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘ठाण्यात सर्व थिएटर्समध्ये ऑनलाइन तिकिटं पण फुल आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. अशातच एका युजरने थेट शो हाऊसफुल असण्यावरून सवाल केला. ‘आमच्या इकडं तर एक काळं कुत्रं जात नाहीये. कसं आणि कुठं चालू आहे हाउसफुल्ल हे,’ असा खोचक प्रश्न संबंधित नेटकऱ्याने केला. त्यावर उत्तर देत हेमंत ढोमेनं लिहिलं, ‘कारण सिनेमा माणसांसाठी बनवलाय. त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल.’ हेमंतची प्रतिक्रिया वाचून अनेकांना हसू अनावर झालं.
View this post on Instagram
इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपटसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच एक नवीन उमेद मनात निर्माण करतो. पहिल्या भागातीत नायिकांची एकमेकांशी फारशी ओळख नव्हती. पण आता त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. ही मैत्री निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नात्यात आणि कथेत काय नाविन्य पहायला मिळेल, याची उत्सुकता ‘झिम्मा 2’ टिकवून ठेवतो. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू यांच्या मुख्य भूमिका आहेत.