एक खून.. अनेक आरोपी.., रहस्याचा अविस्मरणीय गोड अन् गूढ थरार; ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर
प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'जिलबी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गोड ही….अन् गूढ ही,' अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटाने उत्सुकता वाढवली आहे.
उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण आणि चांगल्या विषयाची निवड निर्माते-दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘रहस्याच्या सावल्यांत दडलेला आहे खेळ, विश्वासाचा प्रवास की फसवणुकीचा जाळ?’, असं म्हणत प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून जबरदस्त रहस्याची झलक दिसून येत आहे.
आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. अशाच घडणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल येत्या 17 जानेवारीला चित्रपटगृहात होणार आहे. रहस्य, थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या संमिश्र मांडणीच्या हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या तिघांसोबत पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी आपल्या अभिनयाने मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट, उत्कृष्ट कलाकार यांना एकत्र पाहण्याची पर्वणी ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना लाभणार आहे.
View this post on Instagram
आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना चांगल्या निर्मिती मूल्यांमुळे मराठी चित्रपटांचाही निर्मिती आणि वितरणाचा कॅनव्हास मोठा होईल, असा विश्वास कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला. एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीचे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक या सगळ्यांमुळे वेगळ्या धाटणीचा ‘जिलबी’ प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास निर्माते आनंद पंडित यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल, असा विश्वास दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी व्यक्त केला.
‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट येत्या 17 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.