’50 वर्षांत माझ्या मुलीमुळे मला पहिल्यांदा…’, जितेंद्र पीएम मोदींना काय म्हणाले?
संसदेत 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री, खासदार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. अभिनेते जितेंद्रसुद्धा या स्क्रिनिंगला उपस्थित होते.
अभिनेता विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिधी डोग्रा यांच्या भूमिका असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच संसदेच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये सोमवारी या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांसह अनेक मंत्री, खासदार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मोदींनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट लिहित निर्मात्यांचं तोंडभरून कौतुक केलं. मोदींसोबत अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत, दिग्गज अभिनेते जितेंद्र यांनीसुद्धा हा चित्रपट पाहिला होता.
चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र म्हणाले, “मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं की फिल्म इंडस्ट्रीत मी 50 वर्षे काम करूनही आज पहिल्यांदा माझ्या मुलीमुळे पंतप्रधानांसोबत बसून एखादा चित्रपट पाहतोय. त्यावर ते मला म्हणाले की, तेसुद्धा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा एखादा चित्रपट पाहत आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे.” 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा इथं साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीच्या घटनेमागील सत्य उघड करण्याचा दावा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे. अयोध्येतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर परतणाऱ्या 59 भाविकांना गोध्रा कांडमध्ये आपले प्राण गमवावे लागले होते.
Joined fellow NDA MPs at a screening of ‘The Sabarmati Report.’
I commend the makers of the film for their effort. pic.twitter.com/uKGLpGFDMA
— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2024
मोदींसोबत हा चित्रपट पाहिल्यानंतर खासदार कंगना राणौत म्हणाल्या, “तुम्ही हा चित्रपट नक्की पाहायला हवा, कारण त्यात आपल्या देशाचा इतिहास दाखवला गेला आहे. याआदीच्या काँग्रेस सरकारने वस्तुस्थिती कशी लपवून ठेवली, ज्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, हेही यात सांगण्यात आलं आहे. जे काही घडलं, त्याचा प्रभाव अजूनही जाणवतो हे हा चित्रपट दाखवतो. हे पाहून वाईट वाटतं.”
“आज कलाकारांना इतकं मोकळं स्वातंत्र्य मिळालं आहे की ते त्यांच्या विचारानुसार चित्रपट बनवू शकतात आणि सत्य समोर आणू शकतात हेही बरं वाटतंय”, असंही त्या पुढे म्हणाल्या. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याचं कौतुक केलं होतं. त्यांनी याविषयी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित म्हटलं होतं, ‘आता सत्य समोर येतंय आणि तेदेखील अशाप्रकारे की सामान्य लोकांनाही ते दिसेल, ही चांगली गोष्ट आहे. खोटी कथा केवळ थोड्या काळासाठी टिकते. अखेर वस्तुस्थिती समोर येते.’