“त्यांना भांडताना पाहिलं तेव्हा..”; आमिर खानच्या घटस्फोटाविषयी मुलाचा खुलासा
अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता 2002 मध्ये विभक्त झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा जुनैद हा आठ वर्षांचा होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुनैद त्याच्या आईवडिलांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
अभिनेता आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खानने गेल्या वर्षी ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुनैद त्याच्या बालपणाविषयी आणि आई-वडिलांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांचा मुलगा आहे. आमिर आणि रिना लग्नाच्या 16 वर्षांनंतर 2002 मध्ये विभक्त झाले. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केलं. जुनैद आठ वर्षांचा असताना आमिर आणि रिना यांनी घटस्फोट घेतला होता.
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत जुनैद म्हणाला, “मी आठ वर्षांचा असताना माझे आई-वडील विभक्त झाले. पण त्यांनी आम्हाला कधी तसं जाणवू दिलं नाही. मी 19 वर्षांचा होईपर्यंत त्यांना कधी भांडताना पाहिलं नव्हतं. वयाच्या 19 व्या वर्षी मी माझ्या आई-वडिलांना पहिल्यांदा एकमेकांशी भांडताना पाहिलं होतं. त्याआधी मी कधीच त्यांच्यात मतभेद किंवा भांडणं-वादविवाद पाहिली नव्हती. माझ्या आणि बहीण आयराच्या बाबतीत ते नेहमीच एक होऊन निर्णय घ्यायचे. माझ्या मते पालक म्हणून त्यांनी ही गोष्ट खूप चांगली केली. समजूतदार पालकच असं करू शकतात. दोन चांगली माणसं कधीकधी एकमेकांसाठी चांगली नसतात. पण किमान मी माझं बालपण तरी माझे पालक एकमेकांसोबत आनंदी असताना घालवलं होतं.
“बहीण आयराच्या लग्नानंतर आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून एकमेकांना नियमितपणे भेटण्यासाठी वेळ काढू लागलोय. आम्ही सर्वजण एकमेकांच्या घरापासून 100 मीटरच्या अंतरावर राहतो. त्यामुळे नियमित भेट होतच असते. किंबहुना दर मंगळवारी आमचा एकत्र चहापानाचा कार्यक्रम असतो. आई, आयरा, वडील आणि मी.. सोबत चहा पितो. कधीकधी एखाद्याला वेळ नसतो. पण मंगळवारी संध्याकाळी चहासाठी आम्ही आवर्जून वेळ काढतो. चौघांना नाही जमलं तर तिघांना आणि तिघांना जमलं नाही तर किमान दोघं तरी भेटतो”, असं त्याने पुढे सांगितलं.
आमिर आणि रिना यांची मुलगी आयरासुद्धा एका मुलाखतीत आई-वडिलांच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाली होती. “ते कधीच आमच्यासमोर भांडले नाहीत. मुलांसाठी दोघं नेहमी एकत्र यायचे आणि त्यांच्या स्वत:च्या तक्रारी दूर ठेवायचे. त्यांच्या नात्यात समस्या असूनही ते कुटुंब म्हणून नेहमी सोबत असायचे”, असं तिने सांगितलं होतं.
आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीचं नातं जपलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.