हैदराबाद : एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला. लॉस एंजिलिसमधील या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर नुकताच भारतात परतला. यावेळी विमानतळावर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यानंतर ज्युनियर एनटीआरने हैदराबादमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हा तोच कार्यक्रम आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने ज्युनियर एनटीआरला मागून घेरलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
विश्वक सेन यांच्या आगामी ‘दस का धमकी’ या चित्रपटाच्या कार्यक्रमाला ज्युनियर एनटीआर उपस्थित होता. याच कार्यक्रमात तो चाहत्यांना म्हणाला, “जर तुम्ही मला सतत पुढच्या प्रोजेक्टबद्दल विचारलं, तर मी चित्रपटात काम करणं बंद करेन.” त्याच्या याच वक्तव्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हा कार्यक्रम संपल्यानंतर तो जेव्हा चाहत्यांना अभिवादन करत तिथून निघत होता. तेव्हा सुरक्षारक्षकांना बाजूला सारत एका चाहत्याने ज्युनियर एनटीआरला मागून घेरलं. त्या संबंधित चाहत्याने ज्युनियर एनटीआरला घट्ट पकडून फोटोसाठी मागे खेचलं. तेवढ्यात सुरक्षारक्षकांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीतही त्याचा संयमी स्वभाव चाहत्यांना पहायला मिळाला. ज्युनियर एनटीआरने त्या चाहत्यांना थांबण्यास सांगितलं आणि त्याला फोटो काढण्याची परवानगी दिली.
#JRNTR Love Towards His Fans?❤️pic.twitter.com/mOBwVh8pBJ
— Saloon Kada Shanmugam (@saloon_kada) March 18, 2023
ज्युनियर एनटीआरचा केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ऑस्कर पुरस्कारानंतर तो जेव्हा भारतात परतला, तेव्हासुद्धा विमानतळावर असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती.
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. यावेळी एक नव्हे तर दोन पुरस्कार भारताने आपल्या नावे केले. ए. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात पुरस्कार पटकावला. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. या दोन्ही विजयानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट करत दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.