आपल्या मुलांना शिकवण्याची वेळ..; काजोलच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
रक्षाबंधननिमित्त अभिनेत्री काजोलने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. मुलांचा फोटो पोस्ट करत तिने महिलांच्या सुरक्षेचा त्यात उल्लेख केला आहे. काजोलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपूर्ण देश पेटून उठला आहे. या घटनेविरोधात देशभरात आंदोलनं आणि निदर्शनं सुरू आहेत. मुली आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या इतरही घटनांवरून देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच रक्षाबंधननिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेविषयी पोस्ट लिहिली आहे. बहिणीचं रक्षण करणाऱ्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं जातं. मात्र बहिणीची रक्षा करण्यासोबतच महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं, अशी मागणी या सेलिब्रिटींनी केली आहे. अभिनेत्री काजोलच्या पोस्टनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निसा आणि युगचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये निसा आणि युग हे एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येत आहेत. हा फोटो पोस्ट करत काजोलने मुलांना चांगली शिकवण देण्याचा सल्ला दिला आहे.
काजोलची पोस्ट-
‘रक्षा करणाऱ्यांनो आज तुमचा दिवस आहे. आज सर्व संरक्षकांना समजू द्या की यामुळेच तुम्ही पुरुष बनता. आपल्या सभोवतालच्या स्त्रियांना भीतीविना जगण्यासाठी पुरेसं सुरक्षित वातावरण निर्माण करा. आपल्या मुलांना चांगलं बनण्यास शिकवूया’, असं तिने लिहिलंय.
View this post on Instagram
काजोलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अगदी बरोबर बोललीस तू, प्रत्येकाने याचा विचार करावा’, असं एकाने म्हटलंय. तर ‘खूप सुंदर फोटो आणि योग्य संदेश’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. काजोलने 1999 मध्ये अजय देवगणशी लग्न केलं. या दोघांना 21 वर्षांची मुलगी निसा आणि 13 वर्षांचा मुलगा युग आहे. निसाला अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये पाहिलं गेलंय.
काजोलप्रमाणेच अभिनेता अर्जुन कपूरनेही व्हिडीओ पोस्ट करत रक्षाबंधनच्या दिवशी पुरुषांना खास संदेश दिला. “महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहण्यासोबतच त्यांना सुरक्षित वाटावं असं वातावरण कसं निर्माण करता येईल, याचा विचार पुरुषांनी करावा. भाऊ किंवा पुरुष एका महिलेचं रक्षण करतो, असंच आपल्या मनावर बिंबवलं गेलंय. पण पुरुषांना हे शिकवण्याची गरज आहे की त्यांनी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं”, असं त्याने म्हटलंय.