Kajol | काजोलने शाहरुख ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर प्रश्न केला उपस्थित? सोशल मीडियावर वाद

काजोलने जरी मस्करीत शाहरुखला हा सवाल केला असला तरी काही नेटकऱ्यांनी त्यावरून चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. 'याचा अर्थ इंडस्ट्रीत प्रत्येकाला माहीत आहे की पठाणच्या कलेक्शनमध्ये काहीतरी गडबड नक्की आहे', असं एकाने म्हटलं.

Kajol | काजोलने शाहरुख पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर प्रश्न केला उपस्थित? सोशल मीडियावर वाद
Kajol and Shah Rukh Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2023 | 2:30 PM

मुंबई : अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये काजोलने बरीच मोठी वक्तव्ये केली आहेत. यातील काही वक्तव्यांवरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं. तर तिची काही वक्तव्ये ऐकून चाहते थक्क झाले. यादरम्यान आता काजोलने तिचा बॉलिवूड इंडस्ट्रीतील खास मित्र शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाविषयी असा प्रश्न विचारला आहे, ज्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काजोलने असं स्पष्ट म्हटलंय की तिला ‘पठाण’चं खरं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्यायचं आहे.

काजोलची ‘पठाण’वर टिप्पणी

शाहरुखने जवळपास चार वर्षांनंतर ‘पठाण’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. शाहरुखच्या या चित्रपटाने कमाईचे बरेच रेकॉर्ड मोडले. मात्र आता काजोलने कमाईच्या आकड्यांवर उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा होऊ लागली आहे.

काजोलचा शाहरुखला प्रश्न

‘द ट्रायल’ या सीरिजच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत काजोलला विचारण्यात आलं की जर तिला शाहरुखला एखादा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर ती कोणता प्रश्न विचारणार? त्यावर काजोल म्हणाली, “त्याला मी काय विचारणार? त्याचं सर्व काही सोशल मीडियावर स्पष्ट आहे.” त्यानंतर थोडा विचार करून काजोल मजेशीर अंदाजात पुढे म्हणते, “मी विचारेन की मला खरं खरं सांग की तुझ्या ‘पठाण’ या चित्रपटाने किती कमाई केली होती?” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

काजोलने जरी मस्करीत शाहरुखला हा सवाल केला असला तरी काही नेटकऱ्यांनी त्यावरून चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. ‘याचा अर्थ इंडस्ट्रीत प्रत्येकाला माहीत आहे की पठाणच्या कलेक्शनमध्ये काहीतरी गडबड नक्की आहे’, असं एकाने म्हटलं. तर ‘मलाही हाच संशय आहे की त्यात काहीतरी गडबड आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘धन्यवाद काजोल, तू आम्हाचा संशय खरा केलास’ असंही काहींनी म्हटलंय.