मुंबई : अभिनेत्री काजोल ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथोलॉजी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत काजोल स्त्रियांच्या कामुक भावनांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. समाजात खाण्यापिण्याच्या विषयांप्रमाणेच स्त्रियांच्या कामतृप्ततेबद्दलही मोकळेपणे बोलता यावं, असं ती म्हणाली. ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथोलॉजी चित्रपटात चार दिग्दर्शकांच्या चार विविध कथा पहायला मिळणार आहेत. त्यातील अमित आर. शर्मा दिग्दर्शित एका कथेत काजोलने भूमिका साकारली आहे. तर अभिनेता कुमुद मिश्रा तिच्या पतीच्या भूमिकेत आहे.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, “एकेकाळी समाज म्हणून आपण याबद्दल खूप मोकळे होतो. आपल्या प्राचीन ग्रंथांचा आणि शिक्षणाचा तो एक भाग होता. मात्र नंतर आपण स्वत:ला त्यापासून दूर केलं. पण आपल्या आयुष्याचा हा अत्यंत सामान्य भाग आहे. खाण्यापिण्याच्या गप्पांप्रमाणेच आपण स्त्रियांच्या कामतृप्ततेबद्दल मोकळेपणे बोलायला हवं. त्या विषयावर बोलणं बंद करण्यापेक्षा संवादात त्याचा उल्लेख करण्याविषयी मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल न बोलल्याने उलट त्याकडे अधिक लक्ष वेधलं जातं.”
या मुलाखतीत काजोल सिनेमातील वासनेच्या चित्रणाबद्दलही व्यक्त झाली. ती पुढे म्हणाली, “आधी चित्रपटात दोन फुलांना एकत्र आणून असे सीन्स दाखवले जायचे. माझ्या मते आम्ही त्याच्या एक पाऊल पुढे येऊन लस्ट स्टोरीज 2 सारखा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. सध्याच्या काळातील प्रेमाची व्याख्या काय आहे, त्यानुसार चित्रपटात सीन्स दाखवले जातात. हल्लीच्या काळात कोणी शाश्वत प्रेमकथांवर विश्वास ठेवत नाही. निश्चितपणे कोणालाही प्रेमात मरायचं नाहीये. तू नसेल तर दुसरं कोणीतरी.. असा विचार केला जातो. एकापेक्षा अधिक लोकांवर प्रेम करण्यावर लोक विश्वास ठेवतात. म्हणूनच आतापर्यंत आपण सर्व प्रेमकथा खूप वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत. ते मैत्री, आधुनिक नातेसंबंध आणि समाज यावर अधिक आधारित आहेत.”
‘लस्ट स्टोरीज’चा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. त्यात अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांचा समावेश होता. आता दुसऱ्या भागातही चार वेगवेगळे दिग्दर्शक चार कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. त्यात अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि सुजॉय घोष यांचा समावेश आहे. येत्या 29 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रदर्शित होणार आहे.