मुंबई: ‘अखेर मी भारतातील माझे सर्व व्यवसाय बंद केले आहेत आणि माझी सर्व प्रॉपर्टी विकली आहे. मुंबईत आता माझं फक्त एक घर आणि ऑफिस आहे. ते सुद्धा लवकरच विकलं जाईल’, असं ट्विट एका अभिनेत्याने केलं. या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. नेमकं काय झालं आणि त्या अभिनेत्याने असा का निर्णय घेतला, असे प्रश्न नेटकऱ्यांना पडू लागले. तर काही जणांनी त्यावर मजेशीर कमेंट्सही पोस्ट केल्या आहेत. हा अभिनेता दुसरा, तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे. केआरकेचं हे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.
केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. या ट्विट्समुळे त्याने बॉलिवूडमधल्या काही मोठ्या अभिनेत्यांशीही पंगा घेतला आहे. स्वयंघोषित चित्रपट समिक्षक केआरकेला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. आता त्याने ट्विट करत भारत सोडून जाणार असल्याचं सांगितलं आहे.
‘अखेर मी भारतातील माझे सर्व व्यवसाय बंद केले आहेत आणि माझी सर्व प्रॉपर्टी विकली आहे. मुंबईत आता फक्त माझं एक घर आणि ऑफिस आहे. तेसुद्धा लवकरच विकलं जाणार आहे. माझ्याविरोधातील खोट्या केसेसमुळे मी हे पाऊल उचललं आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करण्याची परवानगी कोणालाच नसली पाहिजे’, असं ट्विट करत त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांनी टॅग केलं.
Nowhere in the world someone can be send to jail for tweets except India. How can police register 3 FIRs against anybody for different tweets, which were done few years ago in 2016, 2018, 2019, 2020!
— KRK (@kamaalrkhan) January 4, 2023
‘जगात कुठेही एखाद्या व्यक्तीला त्याच्या ट्विट्समुळे तुरुंगात पाठवलं जाऊ शकत नाही. हे फक्त भारतातच होऊ शकतं. विविध ट्विट्ससाठी एखाद्या व्यक्तीविरोधात पोलीस तीन एफआयआर कसं काय दाखल करू शकतात? हे ट्विट्स 2016, 2018, 2019 आणि 2020 मध्ये केले होते,’ असंही त्याने पुढे लिहिलंय.
केआरकेच्या या ट्विट्सवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘एखाद्याविरोधात काही बोलताना जरा विचार करायला पाहिजे होता’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘जैसी करनी, वैसी भरनी’ असं दुसऱ्याने म्हटलंय. केआरकेनं 2005 मध्ये ‘सितम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानेच या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि तोच यात मुख्य अभिनेता होता. त्यानंतर 2008 मध्ये त्याचा ‘देशद्रोही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.