बॉलिवूड पार्ट्यांमध्ये नेमकं काय होतं? कंगना राणौत यांच्याकडून पोलखोल
कंगना यांचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्यांनी देशाच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या बॉलिवूड पार्ट्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन विश्वातील विविध मुद्द्यांवर त्या मनमोकळेपणे आपली मतं मांडतात. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. कंगना यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाहीविरोधात नेहमीच आवाज उठवला आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीतील विविध कलाकारांविषयी त्यांनी स्पष्ट मतं मांडली आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी बॉलिवूडमधल्या पार्ट्यांची पोलखोल केली आहे. या पार्टीला उपस्थित राहणारे कलाकार, विशेषकरून अभिनेते हे प्रचंड स्वार्थी आणि गर्विष्ठ असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत माझे कोणीच मित्र-मैत्रिणी नाहीत, कारण ज्या लोकांना ब्रँडेड बॅग्स आणि आलिशान कार या विषयांव्यतिरिक्त काही बोलता येत नाही, त्यांच्यासोबत मी मैत्री करू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
कंगना यांनी राज शमानी यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत म्हटलंय, “मी बॉलिवूडसारखी नाही. बॉलिवूडमधल्या लोकांसोबत माझी मैत्री होऊ शकत नाही, हे मात्र खरंय. ते स्वत:मध्ये प्रचंड मग्न असतात. ते मूर्ख आणि मंद असतात. त्यांच्यासाठी प्रोटीन शेकच खूप महत्त्वाचं असतं. ही गोष्ट समजण्याइतक्या बॉलिवूडमधल्या लोकांना मी भेटले आहे. जर ते शूटिंग करत नसेल तर त्यांचं रुटीन कसं असतं हे मला माहित आहे. सकाळी उठायचं, थोडाफार व्यायाम करायचा, दुपारी झोपायचं, उठायचं आणि पुन्हा जिमला जायचं. पुन्हा रात्री झोपायचं किंवा टीव्ही बघत बसायचं. हे सर्वजण टोळसारखे (किटक) वागतात. आतून एकदम पोकळ आहेत. अशा लोकांसोबत तुम्ही मैत्री कशी करू शकता?”
“जगात कुठे काय चाललंय याविषयी त्यांना काहीच माहिती नसते. त्यांच्यात कधीच अर्थपूर्ण संवाद होत नाहीत. ते फक्त एकमेकांना भेटतात, दारू पितात आणि आपापल्या घरी निघून जातात. ‘हाय बेब, तुझी बॅग किती सुंदर आहे. मला ती खूपच आवडली’, असे त्यांचे संवाद असतात. बॉलिवूडमध्ये जर एखादी अशी व्यक्ती सापडली जी ब्रँडेड बॅग्स आणि कार याव्यतिरिक्त किंवा त्यापलीकडे काही बोलू शकते, तर मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसेल. पण ठराविक लेखक आणि दिग्दर्शक असे आहेत, जे या सर्व गोष्टींच्या पलीकडचे आहेत”, असंही कंगना यांनी म्हटलं आहे.
कंगना यांनी या मुलाखतीत बॉलिवूड पार्ट्यांची पोलखोल केली आहे. “बॉलिवूड पार्ट्यांमध्ये होणाऱ्या गप्पा अत्यंत लज्जास्पद असतात. एकमेकांचं शेड्युल, वजन, डाएट, डेटिंगच्या चर्चा यांविषयीच ते गप्पा मारू शकतात. हा एक प्रकारचा ट्रॉमा आहे. माझ्यासाठी बॉलिवूड पार्टी म्हणजे एक ट्रॉमा आहे”, असं म्हणत कंगना यांनी काही सेलिब्रिटींच्या बोलण्याची नक्कलसुद्धा करून दाखवली. कंगना यांनी नुकतंच राजकारणात पदार्पण केलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यात त्यांना विजय मिळाला.