दो दिल मिल रहे है.. कंगना राणौत – चिराग पासवान यांच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
कंगना या नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक राहिल्या आहेत. अखेर यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात कंगना यांचा विजय झाला.
अभिनय क्षेत्रातून राजकीय विश्वात पदार्पण करणाऱ्या खासदार कंगना राणौत आणि चिराग पासवान हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. खासदार बनल्यानंतर कंगना यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थिती लावली. यावेळी संसदेत जात असताना पायऱ्यांवर त्यांची भेट हाजीपूरचे खासदार चिराग पासवान यांच्याशी झाली. त्यानंतर पायऱ्यांवरच दोघांमध्ये काही सेकंद चर्चा झाली. त्यावेळी सर्वांचं लक्ष त्यांच्याकडेच वेधलं होतं. कंगना आणि चिराग यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
कंगना आणि चिराग यांनी 2011 मध्ये ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तरी आता बऱ्याच वर्षांनंतर कंगना आणि चिराग यांची जोडी मात्र हिट ठरतेय. कंगना यांनी हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेता निवडीची बैठकीसाठी त्या पहिल्यांदा दिल्लीच्या संसदेत पोहोचल्या होत्या. त्यावेळी चिराग पासवान हे फोटोसाठी पोझ देत असताना समोरून जाणाऱ्या कंगना यांना हाक मारून त्यांची गळाभेट घेतात. तेव्हासुद्धा दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
पहा व्हिडीओ-
#WATCH | Union Minister Chirag Paswan and BJP MP Kangana Ranaut arrive at the Parliament. pic.twitter.com/ZZZk61z7d0
— ANI (@ANI) June 26, 2024
आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये कंगना आणि चिराग हे संसदेच्या पायऱ्यांवर एकमेकांची भेट घेतात. त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंद चर्चा होते आणि एका विनोदावर दोघं हसू लागतात. त्यावेळी कंगना या चिराग यांना टाळीसुद्धा देतात आणि एका बाजूने मिठी मारतात. यानंतर दोघं एकत्र संसदेत जातात. यावेळी कंगना यांनी फिक्या पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली होती. तर चिराग हे पांढरा कुर्ता आणि निळ्या जीन्समध्ये दिसून आले. या दोघांना एकत्र पाहून पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला.
‘दो दिल मिल रहे है, पण चुपके चुपके नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘संसदेतील नवीन BFF (बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर)’, असं दुसऱ्याने म्हटलंय. बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार बनलेले चिराग पासवान हे लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष आहेत. केंद्रीय मंत्री राहिलेले दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांची पार्टी एनडीएचा एक भाग आहे. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी चिराग पासवान यांनी अभिनयक्षेत्रात नशीब आजमावलं होतं. मात्र त्यांना फिल्म इंडस्ट्रीत फारसं यश मिळालं नाही. 2014 मध्ये आपल्या वडिलांचा राजकीय वारसा सांभाळायला घेतलेल्या चिराग यांचं राजकारणातील करिअर मात्र सुपरहिट चालत आहे.