मुंबई : हिमाचल प्रदेशमधील कांगडा इथलं बैजनाथ मंदिर हे भाविकांच्या पोशाखावरून चर्चेत आलं आहे. एक मुलगी मंदिरात तोकड्या कपड्यांमध्ये दर्शनासाठी पोहोचली होती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून मोठा वा निर्माण झाला. या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड असावा, अशीही मागणी केली. तर काहींनी तोकड्या कपड्यांमध्ये येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली. यावर अभिनेत्री कंगना रनौतचीही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. कंगनाने व्हायरल फोटोवर ट्विट करत राग व्यक्त केला. त्याचसोबत तिने स्वत:चाही एक किस्सा सांगितला आहे.
ट्विटरवर एका युजरने बैजनाथ मंदिराबाहेरचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘हे दृश्य हिमाचलच्या प्रसिद्ध बैजनाथ या शिव मंदिराचं आहे. बैजनाथ मंदिरात हे लोक असे पोहोचले आहेत, जसं की एखाद्या नाईट क्लबमध्ये गेले असावेत. अशा लोकांना मंदिरात प्रवेशाची परवानगी नसावी. मी याचा तीव्र विरोध करतो. माझ्या विचाराला जर कमी किंवा तुच्छ मानत असाल तरी मला मंजूर आहे.’
मुलीच्या व्हायरल फोटोवर कंगनाने लिहिलं, ‘हे पाश्चिमात्य कपडे आहेत, ज्याचा शोध गोऱ्या लोकांनी लावला आहे आणि त्याचा प्रचार केला आहे. मी एकदा व्हॅटिकनमध्ये शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालून गेले होते. तेव्हा मला आवारातही जाण्याची परवानगी दिली नव्हती. मला हॉटेलमध्ये परत जाऊन कपडे बदलून यावं लागलं होतं. नाइट ड्रेस घालणारे हे विदूषक म्हणजे आळशीपणाच्या लक्षणांशिवाय दुसरं काही नाही. मला वाटत नाही की यात त्यांचा दुसरा कोणता हेतू असेल, पण अशा मूर्खांसाठी कडक नियम असावेत.’
कंगनाच्या ट्विटनंतर हा मुद्दा आणखी चर्चेत आला. ‘मंदिरात जाण्यासाठी एखादा ड्रेस कोड आहे का? नसेल तर आता ड्रेस कोड बनवावा लागेल’, असं एकाने लिहिलं. तर मंदिरात असे कपडे परिधान करून येताना लाज वाटली पाहिजे, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. काहींनी कंगनाच्या ट्विटवरून तिच्यावरही निशाणा साधला आहे. ‘तुम्हीच तुमच्या चित्रपटांमधून अशा कपड्यांना प्रोत्साहन देता आणि सामान्यांनी घातले तर दुटप्पी भूमिका मांडता’, असं नेटकऱ्याने सुनावलं.