कंगना यांचा राजकारणातील स्क्रिप्ट रायटर कोण? संसदेत बोलण्याआधी मिळतात कोणत्या सूचना?
बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आता राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या राजकीय प्रवासाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या.
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट आधी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही सीन्स आणि डायलॉग्सवर कात्री चालवली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात अनेक अडथळे आले. आता काही बदलांनंतर अखेर हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख बनवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि तिथून त्या जिंकूनसुद्धा आल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना राजकारणाविषयी रंजक प्रश्न विचारण्यात आला.
कंगना यांनी ‘अजेंडा आजतक 2024’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी बऱ्याच प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली. कंगना यांनी सांगितलं की राजकारणात कोणतीच स्क्रिप्ट नसते आणि कोणताच दिग्दर्शक नसतो, जो तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. वेळेनुसार त्या त्या गोष्टी मी शिकतेय, असं त्यांनी सांगितलं. “राजकारणात कोणताच पटकथालेखक किंवा दिग्दर्शक नसतो. विशेष म्हणजे आम्ही राजकारणात आहोत याचा अर्थ कुठला तरी ड्रामा करतोय असं नाही. मस्करीत बोलणं वेगळं आहे. आमच्या पक्षात तुम्ही पाहिलंत तर आरएसएसची पार्श्वभूमी असलेले किंवा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही पुढे आलेले बरेच नेते आहेत. या सर्वांच्या भावना हिंदुत्त्ववादी आहेत”, असं त्या पुढे म्हणाल्या.
View this post on Instagram
आपल्या पक्षाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “आमच्या पक्षातील प्रत्येकाची हिंदुत्त्ववादी भावना आहे. ही एक खरी भावना आणि खरं व्यक्तिमत्त्व आहे. आम्हाला पूर्णपणे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. पण पक्षाची काही मार्गदर्शनतत्त्वे आहेत, त्यांचं पालन करणं गरजेचं असतं. आम्हाला एक-दोन वेळा सूचना मिळतात की कोणते विषय टाळले पाहिजेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, शेतकऱ्यांदा मुद्दा असो किंवा आरक्षणाचा मुद्दा असो. तर एक-दोन वेळा आम्हाला यावर बोलण्यास नकार दिला जातो. एक पक्ष म्हणून त्यावर आमची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते आहेत. ते यावर स्पष्टपणे बोलू शकतील. पण आम्हाला इथे कोणता दिग्दर्शक किंवा स्क्रिप्ट मिळते असं नाही.”