कंगना दीदीचा दिलदारपणा! भावाला लग्नात भेट म्हणून दिलं आलिशान घर
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आता खासदार बनल्या आहेत. नुकतंच त्यांच्या चुलत भावाचं लग्न पार पडलं. या लग्नात कंगना यांना नवविवाहित भाऊ आणि वहिनीला हक्काचं घर भेट म्हणून दिलं. या घराचे फोटो भावाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
खासदार बनल्यापासून अभिनेत्री कंगना राणौत त्यांच्या मतदारसंघातील कामात व्यग्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघाचं तिकिट देण्यात आलं होतं. कंगना यांनी या मतदारसंघात काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून खासदारपद आपल्या नावे केलं. निवडणुकीनंतर कंगना यांचा चुलत भाऊ वरुण राणौतचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नात कंगना यांनी तिच्या भावाला भेट म्हणून चंदिगडमध्ये घर घेऊन दिलं. याची माहिती खुद्द वरुणने सोशल मीडियाद्वारे दिली. वरुणने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो पोस्ट करत बहीण कंगना यांचे आभार मानले आहेत.
कंगना यांनी वरुणची पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली. ‘थँक्यू दीदी.. आता चंदीगड हे घर बनलं आहे’, असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केले आहेत. कंगना यांनी बहीण रंगोलीच्या स्टोरीचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ‘प्रिय बहीण.. तू नेहमीच आमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतेस. सर्व गोष्टींसाठी तुझे खूप खूप आभार,’ अशा शब्दांत रंगोलीने कृतज्ञता व्यक्त केली. भाऊबहिणींच्या या पोस्टवर कंगना यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘गुरुनानाक देवजी म्हणाले, आपल्याकडे असलेली छोट्यातली छोटी गोष्ट इतरांसोबत वाटायची. आपल्याला असं नेहमी वाटतं की जे आहे ते पुरेसं नाही. तरीही आपण इतरांना त्यातून दिल्यास, त्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच असू शकत नाही. तुमची प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद’, असं कंगना यांनी लिहिलंय. कंगना यांनी तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये गृहप्रवेशाचेही फोटो शेअर केले आहेत.
कंगना यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात कंगना यांच्यासोबतच अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. खासदार बनल्यानंतर कंगना अभिनय सोडणार का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. नुकत्याच हिमाचल पॉडकास्टमध्ये त्यांनी खुलासा केला की अभिनय सोडण्याचा कोणताच विचार नाही.