कंगनाची जीभ घसरली; RJD नेत्याऐवजी भाजपच्या तेजस्वी सूर्यांचं नाव घेऊन केली टीका
कंगनाच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. "कंगनाने काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आणि त्यांचा अपमान केला. स्वातंत्र्यसेनानींची तुलना बिझनेसमेनशी करून तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत", असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं.
हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचं घोषित झाल्यापासून अभिनेत्री कंगना राणौत सतत चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कंगना जोरदार प्रचार करत आहे. अशातच एका रॅलीदरम्यान कंगनाकडून मोठी चूक झाली. राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांचं नाव घेण्याऐवजी तिने चुकून तिच्याच पक्षातील म्हणजेच भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं. मासे खाण्यावरून कंगनाला तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधायचा होता. हिमाचल प्रदेशातील एका रॅलीदरम्यान तिने हे वक्तव्य केलं. शनिवारी तिच्याच मंडी मतदारसंघात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या रॅलीमध्ये विरोधकांवर टीका करताना कंगना म्हणाली, “ही बिघडलेल्या शहजादांची (राजकुमार) पार्टी आहे. त्यांनाच माहित नाही की त्यांना कुठे जायचं आहे. मग ते राहुल गांधी असो, ज्यांना चंद्रावर बटाटे उगवायचे असतील किंवा मग तेजस्वी सूर्या असो जे गुंडगिरी करतात आणि मासे खातात.” कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यावर तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली. “ये मोहतरमा कौन है (या मॅडम कोण आहेत?)”, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
गेल्या महिन्यात तेजस्वी यादव यांचा एख व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते विकासशील इंसान पार्टीचे (VIP) प्रमुख मुकेश साहनी यांच्यासोबत प्रचारानंतर हेलिकॉप्टरमध्ये मासे खाण्याचा आनंद घेताना दिसले होते. या व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी जोरदार टीका केली होती. नवरात्रीच्या दिवसांत मासे खाल्ल्याने तेजस्वी यादव यांच्यावर टीका झाली होती. नंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं होतं की तो व्हिडीओ नवरात्री सुरू होण्याच्या काही दिवस आधी शूट करण्यात आला होता.
ये मोहतरमा कौन है? https://t.co/RvTfHjm26I
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) May 4, 2024
हिमाचल प्रदेशातील रॅलीदरम्यान कंगनाने केवळ तेजस्वी यादव आणि तेजस्वी सूर्या यांच्या नावातच गोंधळ केला नाही तर तिने काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांवरही टीका केली, ज्यांच्यामुळे पार्टीने तिच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. “माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्यांच्या काळातील अंबानी होते, परंतु त्यांची संपत्ती आणि मालमत्ता कुठून आली हे कोणालाच माहित नाही. ते ब्रिटिशांच्या जवळचे होते आणि त्यांना संपत्ती कुठून मिळाली हे आजवर गुपितच आहे”, अशा शब्दांत कंगनाने निशाणा साधला होता.
“जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान कसे झाले हे कोणालाच माहित नाही, कारण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाजूने मतदान झालं होतं. तेव्हापासून घराणेशाही नावाच्या किड्याने या देशाला संक्रमित केलंय. एकीकडे आपल्याकडे ‘तपस्वींचं सरकार’ (भाजप सरकार) आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे ‘भोगी लोकांचं सरकार’ (काँग्रेस) आहे, जे शहजादांच्या छोट्या टोळ्यांनी बनलेली आहे. एक दिल्लीत आहे आणि दुसरी इथे हिमाचल प्रदेशमध्ये आहे”, मंडीमधील काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंग यांच्यावर निशाणा साधत तिने ही टीका केली होती.