कंगनाला नाही शेअर मार्केटवर भरोसा, पाहा कुठे गुंतवलेत करोडो रुपये
अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडनंतर आता राजकारणात आपलं नशीब आजमावत आहे. तिने लोकसभा निवडणुकीसाठी आज मंडी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय. कंगना रनौतने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिच्या संपत्तीची घोषणा केली आहे. कंगनाने कुठे केलीये करोडो रुपयांची संपत्ती जाणून घ्या.
kangana ranaut net worth : कंगना रणौतने १४ मे रोजी मंडी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ती भाजपकडून उमेदवार आहे. कंगनाने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रोड शो देखील केला. हिमाचलची प्रसिद्ध टोपी घालून ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचली होती. कंगना राणौतसोबत माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल आणि कंगनाची आई देखील होती.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली कंगना रनौत हिने करोडो रुपये कमवले आहेत. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिने ही सर्व माहिती निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, कंगना राणौतकडे 6.70 किलो सोने आहे. ज्याची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे. या व्यतिरिक्त तिच्याकडे 50 लाख रुपये किमतीचे 60 किलो चांदी आणि 3 कोटी रुपये किमतीचे हिरे देखील आहेत.
एलआयसीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक
कंगना रणौतचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. ज्याचे नाव मणिकर्णिका फिल्म्स प्रोडक्शन असे आहे. या कंपनीत तिने अंदाजे 1.21 कोटी रुपये गुंतवले आहेत. कंगनाने कोणत्याही म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेली नाही. कंगनाचा शेअर बाजारावर विश्वास दिसत नाहीये. कारण तिने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया – LIC मध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. कंगनाकडे LIC च्या 50 पॉलिसी आहेत. यापैकी 48 पॉलिसी प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या कव्हरेजच्या आहेत आणि 2 पॉलिसी प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या कव्हरेजच्या आहेत.
कंगनाकडे अनेक महागड्या गाड्या
प्रतिज्ञापत्रा सादर केलेल्या माहितीनुसार, कंगना राणौतकडे 98 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू 730 एलडी, 58 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ आणि 3.91 कोटी रुपयांची मर्सिडीज मेबॅच कार आहे. महागड्या कारशिवाय कंगनाकडे वेस्पा स्कूटरही आहे. अशाप्रकारे कंगना राणौतकडे 28 कोटी, 73 लाख, 44 हजार रुपयांची रोकड, सोने, चांदी आणि वाहने आहेत.
कंगना रनौतने बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवल्यानंतर आता ती निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहे. त्यामुळे आता हिमाचलीची जनता तिला निवडून देणार की नाही याचा फैसला निवडणूक निकालानंतरच होणार आहे.