मी हिरोइन किंवा स्टार नाही तर..; कंगनाचा मंडीमध्ये जोरदार रोड शो
अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आक्रमकरित्या उतरली आहे. मंडी या मतदारसंघात तिने नुकताच रोड शो केला. या रोड शोदरम्यान तिने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचसोबत लोकांना भावनिक आवाहनसुद्धा केलंय.
अभिनेत्री कंगना राणौत भाजपच्या तिकिटावरून हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहे. राजकारणात उतरताच कंगनाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच तिने मंडी या आपल्या मतदारसंघात रोड शो केला. यावेळी जनतेशी संवाद साधताना तिने विरोधकांवरही निशाणा साधला. “मंडीतील लोकांना या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांची मुलगी आणि बहीण आता निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. विकास हाच भाजपचा मुद्दा आहे आणि मंडीमधील लोक हे दाखवून देतील की त्यांच्या मनात काय आहे”, असं ती यावेळी म्हणाली. मला हिरोइन किंवा स्टार समजू नका. मला तुमचीच बहीण किंवा मुलगी समजा, असं भावनिक आवाहन तिने लोकांना केलं.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाविषयी जी वादग्रस्त पोस्ट लिहिली होती, त्याचाही उल्लेख तिने रोड शो दरम्यान केला. “जे लोक तुमच्या मुलीची किंमत ठरवतात, ते कधीच तुमचे होऊ शकत नाहीत. जे प्रभू श्रीराम यांचे होऊ शकत नाहीत, ते तुमचे कधीच होऊ शकत नाही”, अशा शब्दांत तिने टोला लगावला. मंडी काय आहे, हे इथले लोकच सांगतील. मतदान करताना लोक काँग्रेसला चोख उत्तर देतील, असंही ती या रोड शोदरम्यान म्हणाली.
#WATCH | Himachal Pradesh: BJP candidate from Mandi Lok Sabha seat, actor Kangana Ranaut says, “… Congress could not accept my nomination from Mandi. They started doing cheap politics. Their leader Rahul Gandhi talks about destroying the ‘shakti’ in Hindus. Their spokesperson… pic.twitter.com/D53fySekCz
— ANI (@ANI) March 29, 2024
“काँग्रेसला मंडीमधून माझी उमेदवारी मान्य नाही. म्हणूनच ते खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत. त्यांचे नेते राहुल गांधी हे हिंदूंमधील शक्ती नष्ट करण्याबद्दल बोलतात. त्यांचे प्रवक्ते मंडीमधील महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करतात. मंडी हे नाव ऋषी मांडव यांच्या नावावरून मिळालं आहे. याठिकाणी ऋषी पराशर यांनी तपश्चर्या केली होती. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी मोठ्या जत्रेचं आयोजन केलं जातं. अशा मंडीमधील महिलांबद्दल ते आक्षेपार्ह टिप्पणी करतात. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा असेल”, अशा शब्दांत कंगनाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर राज्यातील एकमेकांशी भांडणारे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.