भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींवर भडकली कंगना; म्हणाली ‘महिला फक्त त्या गोष्टीसाठीच नाहीत, तर..’
विजयादशमीनिमित्त अभिनेत्री कंगना रनौतने रावणदहन केलं. यावरून अनेकांकडून टीका करण्यात आली. भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनीसुद्धा एक ट्विट केलं होतं. त्यावर आता कंगनाने सडेतोड उत्तर दिलं आहे. स्त्री शरीराबद्दलची सुप्त लालसा या गोष्टी तुम्हाला विकृत बनवत आहेत, असं ती थेट म्हणाली.
मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | विजयादशमीला रावण दहन करण्याची परंपरा आहे. दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ असलेल्या मैदानात लव-कुश रामलीलामध्ये रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. दरवर्षी हा मान एखाद्या पुरुष सेलिब्रिटीला किंवा राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीला मिळतो. यंदा पहिल्यांदाच हा मान एखाद्या स्त्रीला मिळाला होता. अभिनेत्री कंगना रनौतला रावण दहनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. गेल्या 50 वर्षांची प्रथा कंगनाने बदलली. याची सर्वत्र चर्चा झाली. मात्र यात असेही काही लोक होते, ज्यांना कंगनाच्या हातून रावण दहन करण्यावर आक्षेप होता. त्यात माजी कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांचाही समावेश होता. त्यांना आता कंगनाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
कंगनाला ट्रोल करणारे अनेक मीम्स आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापैकीच एक मीम सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर केला होता. या पोस्टमध्ये कंगना पांढऱ्या बिकिनीमध्ये दिसली. यासोबत त्यावर युजरने लिहिलं होतं, ‘ही कंगना रनौतच आहे का? बॉलिवूडची एकमात्र महिला जिला मोदी सरकारकडून एंटरटेन केलं जातं?’ हीच पोस्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी शेअर करत त्यावर टिप्पणी केली. ‘रामलीलाच्या अंतिम दिवशी कंगना रनौतला प्रमुख पाहुणी बनवणं हे मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्यासाठी अशोभनीय आहे’, असं त्यांनी लिहिलं होतं.
कंगनाचं प्रत्युत्तर-
With a swimsuit picture and sleazy narrative you are suggesting that I have nothing else to offer except for my flesh to get my way in politics ha ha I am an artist arguably the greatest of all time in hindi films, a writer, director, producer, revolutionary right wing… https://t.co/dEcqamn7qO
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2023
सुब्रमण्यम स्वामी यांच्या या पोस्टवर कंगनाने आता उत्तर दिलं आहे. “स्विमसूटमधील फोटो आणि नीच कथेसह तुम्ही असा सल्ला देत आहात की राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी माझ्याकडे शरीराशिवाय आणखी वेगळं काहीच नाही. हाहाहाहा. मी हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रतिभावान कलाकार, लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका आणि क्रांतीकारी आहे. जर माझ्या जागी एखादा तरुण पुरुष असता आणि जो भावी नेता असता, तर तुम्ही तेव्हा पण हेच मानाल का, की कदाचित राजकारणात येण्यासाठी तो स्वत:च्या शरीराला विकत आहे?”, असा सवाल कंगनाने केला.
या पोस्टमध्ये कंगनाने पुढे लिहिलं, ‘खोलवर रुजलेला सेक्सिज्म आणि स्त्री शरीराबद्दलची सुप्त लालसा या गोष्टी तुम्हाला विकृत बनवत आहेत. स्त्रिया केवळ सेक्ससाठी नसतात, त्यांच्याकडे मेंदू, हृदय, हात, पाय असे इतरही अवयव असतात जे पुरुषांकडेही असतात किंवा जे एक महान नेता होण्यासाठी आवश्यक असतं. मग मी रावणदहन का करू नये?’