Dussehra : दसऱ्यानिमित्त कंगना रनौत बदलणार 50 वर्षे जुनी प्रथा; पहा व्हिडीओ
"आता एक महिलासुद्धा रावणाच्या पुतळ्याला आग लावू शकते, वाईट गोष्टींचा अंत करू शकते. महिलांनाही हा अधिकार मिळायला हवा आणि म्हणूनच आम्ही कंगनाची निवड केली", असं दिल्लीच्या लव-कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह म्हणाले.
मुंबई : 24 ऑक्टोबर 2023 | बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मात्र त्यापूर्वी दसऱ्यानिमित्त कंगना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या 50 वर्षांपासूनची जुनी प्रथा कंगना बदलणार आहे. आज दसऱ्यानिमित्त दिल्लीतील लव-कुश रामलीला इथं ती रावण दहन करणार आहे. हे करणारी ती पहिलीच महिला ठरणार आहे. लाल किल्ल्यावर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला रावण दहन करणार आहे. याबद्दलची माहिती खुद्द दिल्लीच्या लव-कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी दिली.
कंगनाने सोमवारी इन्स्टाग्रामवर याबद्दलचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटाबद्दल आणि दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल सांगितलं. ‘लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित या कार्यक्रमाच्या 50 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखाद महिला रावण दहन करेल. जय श्रीराम’, असं तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
अर्जुन सिंह याविषयी म्हणाले, “सप्टेंबर महिन्यात संसदेत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली. त्याला अनुसरून समितीने हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आमच्या कार्यक्रमात एखाद्या फिल्म स्टार किंवा मोठ्या राजकारणी व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जातं. यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तर फिल्म स्टार्सपैकी अजय देवगण, जॉन अब्राहम, प्रभास यांनी रावण दहन केलं होतं. आता आमच्या या कार्यक्रमात गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच एक महिला रावण दहन करणार आहे.”
“लव-कुश रामलीला समितीचंही असं मत आहे की महिलांना समान अधिकार मिळायला हवेत. आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. मात्र अजूनही आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. महिला आरक्षण विधेयक देश आणि समाजाच्या विकासात मदत करेल. स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला संकुचित वृत्ती दूर करण्याची गरज आहे”, असं अर्जुन पुढे म्हणाले.