‘कंगुवा’ एडिटर निशाद युसूफचं निधन; राहत्या घरी आढळला मृतावस्थेत
बॉबी देओल आणि सूर्या यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'कंगुवा' या चित्रपटासाठी एडिटर म्हणून काम करणारा निशाद युसूफ राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. निशादच्या निधनाने संपूर्ण मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध फिल्म एडिटर निशाद युसूफ त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला. बुधवारी कोची इथल्या अपार्टमेंटमध्ये युसूफचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूमागच कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र पोलिसांनी युसूफच्या आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. ‘मातृभूमी’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, निशाद युसूफच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. ‘द फिल्म एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ केरळ’च्या (FEFKA) डायरेक्टर्स युनियनने निशाद युसूफच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
युनियनने त्यांच्या फेसबुक पेजवर निशाद युसूफचा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘बदलत्या मल्याळम चित्रपटांच्या कंटेम्पररी भविष्याला निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या निशाद युसूफ यांच्या निधनाचं वृत्त मोठा धक्का देणारं आहे. FEFKA डायरेक्टर्स युनियनकडून संवेदना व्यक्त करतो.’ प्रसिद्ध मल्याळम अभिनेता आणि ‘कंगुवा’ या चित्रपटासाठी निशादसोबत काम करणारा अभिनेता सूर्यानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. ‘निशाद आता आपल्यात नाही, हे ऐकून मन सुन्न झालंय. कंगुवा चित्रपटाच्या टीममधील एक शांत आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून तुझी नेहमीच आठवण येईल’, अशा शब्दांत सूर्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
Heartbroken to hear Nishadh is no more! You’ll always be remembered as a quiet and important person of team Kanguva.. In our thoughts and prayers..! My heartfelt condolences to Nishadh’s family & friends. RIP pic.twitter.com/ClAI024sUe
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) October 30, 2024
निशाद युसूफने ‘उंडा’ आणि ‘थल्लुमाला’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलंय. नुकताच त्याने सर्वोत्कृष्ट एडिटरचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला होता. सूर्या आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘कंगुवा’ या चित्रपटाचा तो एडिटर होता. हा चित्रपट येत्या 14 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निशादच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.