मुंबई: ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं. अभिनेता ऋषभ शेट्टीने यात मुख्य भूमिका साकारली आणि त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात ऋषभसोबत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सप्तमी गौडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटातून सप्तमी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘द व्हॅक्सिन वॉर’ असं आहे. खुद्द अग्निहोत्रींनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सप्तमीच्या भूमिकेविषयी माहिती दिली आहे.
‘या प्रोजेक्टचा एक भाग बनल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. या संधीसाठी विवेक अग्निहोत्रींचे आभार’, असं ट्विट सप्तमीने केलं. त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटातील तुझी भूमिका अनेकांच्या हृदयाला स्पर्श करणारी असेल.’
विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर तब्बल 11 विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एखादा भारतीय चित्रपट 11 भाषांमध्ये प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिंदी, इंग्रजी, बांगला, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती आणि मराठी या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Welcome Sapthami.
Your role in #TheVaccineWar will touch many hearts. https://t.co/aVsCGlmwgX— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 13, 2023
‘भारताने लढलेल्या आणि आपल्या विज्ञानाच्या, धैर्याच्या आणि महान भारतीय मूल्यांच्या आधारे जिंकलेल्या एका लढाईची खरी आणि अविश्वसनीय कथा. 2023 मध्ये स्वातंत्र्यदिनी 11 विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे,’ अशी पोस्ट त्यांनी चित्रपटाची घोषणा करताना लिहिली होती.
सप्तमीला ‘कांतारा’ या चित्रपटाची ऑफर तिच्या सोशल मीडियावरील एका फोटोमुळे मिळाली होती. “लॉकडाऊनमध्ये मी कर्नाटक टुरिझमवर एक व्हिडीओ केला होता. आम्ही मैसूरमधील चामुंडी बेट्टावर गेलो होते. तिथलाच एक फोटो मी इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. तोच फोटो ऋषभ सरांनी पाहिला. ते मला इन्स्टाग्रामवर फॉलोसुद्धा करत नव्हते, पण त्यांना त्यांच्या फीडमध्ये माझा फोटो दिसला. त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला”, असं तिने सांगितलं होतं.