‘कांतारा’ने मोडला ‘उरी’चा जादुई रेकॉर्ड; या वर्षातला तिसरा सर्वांत मोठा चित्रपट
बॉक्स ऑफिसवर Kantara सुसाट; 'उरी'च्या जादुई विक्रमावर कोरलं आपलं नाव
मुंबई- 2022 हे वर्ष कन्नड चित्रपटसृष्टीसाठी आनंददायी ठरत आहे. एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ 2’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. तर ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचतोय. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाला थिएटरमध्ये 40 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र या चित्रपटाची कमाई आतापर्यंत ओपनिंग कमाईपेक्षाही अधिक होताना दिसतेय.
कांताराचा हिंदी व्हर्जन 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. ‘कांतारा’ने सहाव्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत 17.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या विकी कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने सहाव्या आठवड्यात 11.60 कोटी रुपये कमावत ऑल-टाइम रेकॉर्ड केला होता. या रेकॉर्डला बॉक्स ऑफिस तज्ज्ञांनी ‘जादुई’ म्हटलं होतं.
सहाव्या आठवड्याच्या फक्त तीन दिवसांत कांताराने उरीचा हा विक्रम मोडला आहे. सहाव्या आठवड्याअखेर त्याची कमाई जवळपास 26 ते 27 कोटींच्या घरात होण्याची शक्यता आहे. फक्त उरीच नव्हे तर कांताराने ‘बाहुबली 2’च्या कमाईलाही मागे टाकलंय.
बाहुबली 2 ची सहाव्या आठवड्याची कमाई ही 11 कोटी रुपये इतकी होती. तर केजीएफ 2 ने सहाव्या आठवड्यात 7.88 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. RRR ने फक्त 4.56 कोटी रुपये कमावले होते. म्हणजेच कांताराने सहाव्या आठवड्याचा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला आहे.
2022 या वर्षभरातील आतापर्यंतचे टॉप 5 चित्रपट-
1- केजीएफ 2- 859.55 कोटी रुपये 2- RRR- 772.10 कोटी रुपये 3- कांतारा- 267.55 कोटी रुपये (रविवारपर्यंत, कमाई अद्याप सुरू) 4- ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा- 268.56 कोटी रुपये 5- पोन्नियिन सेल्वन 1- 265.64 कोटी रुपये