Kantara: बॉलिवूडच्या तिन्ही चित्रपटांच्या एकत्रित कमाईपेक्षा ‘कांतारा’ची कमाई अधिक
बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'ची जादू कायम; बॉलिवूडच्या फोन भूत, मिली, डबल एक्सएलने केली निराशा
मुंबई- शुक्रवारी बॉलिवूडचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र पहिल्या दोन दिवसांतच हे चित्रपट फ्लॉप ठरत असल्याची चिन्हे दिसत आहेत. कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट या तिघांमध्ये सर्वांत मोठा आहे. याच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची निराशा झाली. या चित्रपटाच्या कमाईची सुरुवातच धीम्या गतीने झाली. त्यामुळे यापुढील कमाईचा वेगही मंदावलेलाच असल्याचं दिसतंय.
‘फोन भूत’शिवाय जान्हवी कपूरचा ‘मिली’ आणि हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा यांचा ‘डबल एक्स एल’ हे दोन चित्रपटसुद्धा शुक्रवारीच प्रदर्शित झाले. मात्र या दोन्ही चित्रपटांची कमाईसुद्धा अपेक्षेपेक्षा फारच कमी दिसून येतेय. मात्र ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाचा हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय.
कांतारा या चित्रपटाला प्रदर्शित होऊन महिना होत आला आहे. ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत या चित्रपटाने शुक्रवारी बॉलिवूडच्या तिन्ही चित्रपटांच्या एकत्रित कमाईपेक्षाही अधिक कमाई केली.
फोन भूतने पहिल्या दिवशी 2.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.75 कोटी रुपये कमावले. आता दोन्ही दिवसांची कमाई ही 4.80 कोटींवर पोहोचली आहे. दुसरीकडे जान्हवी कपूरच्या ‘मिली’ने पहिल्या दिवशी एक कोटी रुपयेसुद्धा कमावले नाही. या चित्रपटाची ओपनिंग 50 लाख रुपयांच्या जवळपास झाली. दुसऱ्या दिवशी ही कमाई किंचितशी वाढून 60 ते 70 लाखांपर्यंत पोहोचली. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्या ‘डबल एक्स एल’ने पहिल्या दिवशी जेमतेम 30 लाखांची कमाई केली.
कांताराच्या हिंदी व्हर्जनने शुक्रवारी 2.10 कोटी रुपये कमावले. तर शनिवारी याच्या दुप्पट कमाई झाली. गेल्या 23 दिवसांत कांताराच्या हिंदी व्हर्जनची कमाई 57.90 कोटी रुपये इतकी झाली आहे.