Kantara: ‘कांतारा’च्या ऋषभ शेट्टीने खऱ्याखुऱ्या भूत कोलामध्ये घेतला भाग; व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा!
या चित्रपटात दाखवण्यात आलेली भूत कोलाची परंपरा आणि दैव नर्तक यांच्याविषयी देशभरातील प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं. आता खुद्द ऋषभने कर्नाटकातील एका गावात पार पडलेल्या भूत कोलामध्ये सहभाग घेतला आहे.
बेंगळुरू: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाला गेल्या वर्षी प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटाचं इतर भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं. इतर भाषांमध्येही ‘कांतारा’ला तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात दाखवण्यात आलेली भूत कोलाची परंपरा आणि दैव नर्तक यांच्याविषयी देशभरातील प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं. आता खुद्द ऋषभने कर्नाटकातील एका गावात पार पडलेल्या भूत कोलामध्ये सहभाग घेतला आहे.
‘कांतारा’ चित्रपटात कर्नाटकाच्या एका गावातील काल्पनिक कथा लावण्यात आली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये भूत कोला उत्सव आणि कर्नाटकच्या लोककथा, पौराणिक कथांचा प्रमुख भाग असलेल्या दैव नर्तकांविषयी कुतूहल निर्माण केलं. कांताराची निर्मिती कंपनी होंबाळे फिल्म्सने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ऋषभ शेट्टी, सप्तमी गौडा आणि चित्रपटाची इतर टीम भूत कोलाच्या उत्सवात सहभागी झाल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी ऋषभने तिथल्या दैव नर्तकाचीही भेट घेतली.
‘तुम्ही निसर्गाच्या शरणी जा आणि त्या देवाची पूजा करा, ज्याने तुम्हाला आयुष्यात इतकं यश आणि स्वातंत्र्य दिलं आहे. कांतारा चित्रपटाच्या टीमने परमात्म्याचं प्रत्यक्ष रुपात दर्शन घेतलं आणि दैवाचा आशीर्वाद घेतला’, असं कॅप्शन या व्हिडीओ देण्यात आला आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. यातील एका दृश्यात दैव नर्तक जेव्हा ऋषभच्या जवळ येतात, तेव्हा अंगावर काटा उभा राहत असल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली.
कांतारा या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द ऋषभ शेट्टीनेच केलं असून त्यात त्याने मुख्य भूमिकाही साकारली आहे. अवघ्या 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 400 कोटी रुपयांची कमाई केली. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला.