करण जोहरच्या जुळ्या मुलांची आई कोण? युजरने प्रश्न विचारताच दिग्दर्शकाने दिलं उत्तर
2017 मध्ये करण जुळ्या मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत. नुकताच त्याने रुहीचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यावर एका युजरने तिची आई कोण आहे, असा प्रश्न विचारला असता खुद्द करणनेच त्याला उत्तर दिलं आहे.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. चाहत्यांसोबत तो विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून करण दोन मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत. या मुलांची आई कोण आहे, असा प्रश्न याआधीही अनेकदा त्याला विचारण्यात आला होता. मात्र आता खुद्द करणने एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी रुहीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रुही तिच्या आयफोनमध्ये ‘सिरी’ला गाणं गाण्यास सांगते. तिच्या या गमतीशीर व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री नीलम कोठारी, आयुषमान खुराना, सबा पतौडी यांसारख्या सेलिब्रिटींनी रुहीचं कौतुक केलंय. मात्र एका युजरने रुहीची आई कोण आहे, असा प्रश्न विचारला.
‘रुहीची आई कोण आहे? कृपया कोणीतरी मला सांगू शकेल का? मी खूप संभ्रमात आहे’, अशी कमेंट एका युजरने केली. त्यावर खुद्द करण जोहरने उत्तर दिलं आहे. ‘मी आहे. तुमच्या संभ्रमाविषयी मला खूप काळजी वाटतेय म्हणून मला तुमच्या समर्पक आणि या व्हिडीओशी संबंधित प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं’, असं करणने लिहिलंय. रुहीची आई आणि बाबासुद्धा मीच आहे, असं करणने म्हटलंय.
View this post on Instagram
याआधीही विविध मुलाखतींमध्ये करण त्याच्या मुलांच्या संगोपनाविषयी, एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. आई हिरू यांच्यासोबत मिळून करण त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतोय. त्याची मुलं त्याला त्यांच्या आईविषयी आणि जन्माविषयी प्रश्न विचारू लागले आहेत, असंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मुलांच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याला आवश्यक ते मार्गदर्शन घ्यावं लागलं, असंही तो म्हणाला होता. फाये डिसूझा यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला होता, “आमची मॉडर्न फॅमिली आहे. ही एक असामान्य परिस्थिती आहे. म्हणून मला मुलांच्या विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. आमचा जन्म कोणाच्या पोटी झाला? आमची मम्मा ही खरी मम्मा नाही, ती आमची आजी आहे, अशा प्रश्नांचा भडीमार माझ्यावर होतोय. त्यासाठी मी स्वत: समुपदेशन घेण्यासाठी शाळेत जातोय. अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, त्यांना काय उत्तरं द्यायची, हे सर्व मी समजून घेतोय. अर्थात हे सर्व सोपं नाही. किंबहुना पालक होणं कधीच सोपं नसतं.”