‘मुस्लिमाशी लग्न केलंस तर गोळ्या..’ धमक्यांनंतर ऐनवेळी बदललं विवाहस्थळ; शर्मिला टागोर यांचा खुलासा
शर्मिला टागोर आणि टायगर पटौदी यांना तीन मुलं आहेत. सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा पतौडी अशी ही ती मुलं आहेत. सैफ आणि सोहाने आईच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात काम केलं. तर सबा पतौडी ही लाइमलाइटपासून कायम दूर असते. ती ज्वेलरी डिझायनिंगचं काम करते.
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : शर्मिला टागोर या बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या शर्मिला टागोर यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं फिल्मी करिअर सत्यजित रे यांच्या ‘आपूर संसार’ नावाच्या एका बंगाली चित्रपटापासून सुरू झालं. 1964 मध्ये शर्मिला यांनी ‘काश्मीर की कली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
कानपूरमध्ये उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शर्मिला टागोर यांचं बालपण आणि तारुण्यातील बहुतांश काळ कोलकातामध्येच गेला. शर्मिला यांचे वडील जितेंद्रनाथ टागोर हे ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते तर त्यांची आई गृहिणी होती. वडील नोबेल पुरस्कार विजेते साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवारातून होते. तर आई आसामच्या बरुआ कुटुंबातील होती. या दोघांनी त्यांच्या मुलीचे संगोपन अत्यंत खुल्या विचारांनी केलं.
लग्नावरून धमक्या
बॉलिवूड पदार्पणाच्या चार वर्षांनंतर 1968 मध्ये शर्मिला टागोर यांनी क्रिकेटर नवाब मन्सूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं. धर्माची सीमा ओलांडून लग्न करणं त्याकाळी सहज सोपं नव्हतं. शर्मिला टागोर यांना एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यासाठी बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला यांनी त्याविषयीचा खुलासा केला.
शर्मिला यांनी या मुलाखतीत सांगितलं, “माझ्या किंवा माझ्या पतीच्या कुटुंबात त्यावेळी कोणीच धर्माबाहेर जाऊन लग्न केलं नव्हतं. दोन्ही कुटुंबीयांसाठी हे फारच वेगळं होतं. आमच्या लग्नाची बातमी पसरताच घरात धमक्यांचे फोन येऊ लागले होते. जर तू एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलंस तर त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा, अशा धमक्या मला मिळू लागल्या होत्या. गोळ्यांचा वर्षाव होईल, तेव्हा तुला अक्कल येईल.. असंही म्हटलं गेलं. जर दोन समजूतदार व्यक्ती स्वतःच्या मर्जीने एकत्र राहू इच्छित आहेत तर त्यामुळे लोकांना काय समस्या असावी असा प्रश्न मला पडला होता.”
अखेर बदललं विवाहस्थळ
सततच्या धमक्यांमुळे शर्मिला यांच्या कुटुंबीयांनी लग्नाविषयी चिंता व्यक्त केली होती. लग्नाच्या दिवशी काही समस्या निर्माण होऊ नये यासाठी ते चिंतेत होते. याच कारणामुळे अखेर त्यांना ऐनवेळी विवाहस्थळ बदलावं लागलं होतं. शर्मिला टागोर यांचं लग्न आधी कोलकातामधील फोर्ट विलियममध्ये होणार होतं. मात्र नंतर त्यांनी शर्मिलाच्या वडिलांच्या एका ॲम्बेसेडर मित्राच्या घरी लग्न केलं.
नवाब पटौदी यांच्याशी लग्न करण्यासाठी शर्मिला यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला होता. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचं नावही बदलण्यात आलं होतं. शर्मिला टागोर हे नाव बदलून आयेशा सुल्तान असं नाव ठेवण्यात आलं होतं. मात्र संपूर्ण जगासाठी त्या आजही शर्मिला टागोर याच नावाने ओळखल्या जातात. लग्नानंतरही त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलं. मात्र मूलबाळ झाल्यानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून दूर गेल्या.