Kareena Kapoor | करीना-सैफने मीडियापासून का लपवला नाही मुलांचा चेहरा? अभिनेत्रीकडून खुलासा
हल्ली अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांचे फोटो काढण्यापासून पापाराझींना रोखतात. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही मुलांचे फोटो पोस्ट करत नाहीत. त्यांचा चेहरा लपवतात. करीनाने तैमुर किंवा जेहसोबत असं कधीच केलं नाही.
मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलांचीही लोकप्रियता एखाद्या सेलिब्रिटीइतकीच आहे. मोठा मुलगा तैमुर हा लहानपणापासूनच पापाराझींच्या घोळक्यात राहिला आहे. अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना मीडिया आणि पापाराझींपासून दूरच ठेवणं पसंत करतात. आलिया भट्ट, अनुष्का शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींनी अद्याप सोशल मीडियावरही मुलींचा फोटो पोस्ट केला नाही. मात्र सैफ – करीनाने त्यांच्या मुलांबाबत असं काहीच केलं नाही. तैमुर आणि जेह हे लहानपणापासूनच मीडिया आणि पापाराझींसमोर आले आहेत. याविषयी करीना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. आपल्या मुलांना मीडिया आणि पापाराझींपासून का दूर ठेवलं नाही, यामागचं कारण तिने सांगितलं.
‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात करीना म्हणाली, “हे थोडं कठीण आहे, पण आम्ही मुलांचा चेहरा कधीच लपवला नाही किंवा त्यांचे फोटो क्लिक करण्यापासून पापाराझींना रोखलं नाही. कारण मला असं वाटतं की जर आपण आपल्या मुलांचा चेहरा लपवला तर त्यांच्या डोक्यावर त्याचा परिणाम होईल. माझे आईवडील माझ्यासोबत असं का वागत आहेत, मला का लपवत आहेत, असा प्रश्न त्यांना पडतो. त्या प्रश्नांचा त्यांच्यावर परिणाम होऊ लागतो. सैफचं म्हणणं असतं की आपण त्यांना जितकी विनंती करता येईल करू. बाकी त्यात काही गैर नाही.”
“तैमुर जेव्हा चार वर्षांचा झाला, तेव्हा त्याला हळूहळू गोष्टी कळत होत्या. तो खूप स्मार्ट आहे. त्याला माहीत आहे की त्याचे आईवडील कलाकार आहेत आणि ते फिल्म इंडस्ट्रीत काम करतात. मात्र तो आम्हाला म्हणायचा की मी प्रसिद्ध नाही तर हे लोक माझे फोटो का क्लिक करत आहेत. तेव्हा आम्ही त्याची समजूत काढायचो की तू शांत राहा. आता तुम्ही त्याला पाहिलंत तर तो मान खाली घालून चालू लागतो. त्याला खरंतर हे आवडत नाही. पण त्याच्यापासून या गोष्टी लपवल्या, तर त्याचा उलटा परिणाम होईल. म्हणून आम्ही मीडियासमोर कधीच त्यांना लपवलं नाही”, असंही तिने पुढे स्पष्ट केलं.
View this post on Instagram
तैमुर या नावावरून झालेल्या ट्रोलिंगबद्दलही करीना या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. “कोणत्याही आई किंवा मुलाला अशा अनुभवाचा सामना करावा लागू नये. मला आजही त्या ट्रोलिंगमागचं कारण कळत नाही. कारण कोणालाच इतरांचा अपमान करायचा नसतो किंवा दुखवायचं नसतं. आपल्याला भाषणस्वातंत्र्य आहे, आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य आहे. किमान मला आणि सैफला तरी असंच वाटतं”, असं करीना म्हणाली.