बिग बी एकदा वापरलेले कपडे फेकून देतात? KBC मध्ये स्पर्धकाच्या प्रश्नावर अमिताभ बच्चन यांचं मजेशीर उत्तर
महागड्या कपड्यांचं बिग बी काय करतात? स्पर्धकाच्या कुतूहलाचं मिळालं उत्तर

मुंबई- अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या क्विज शोचा चौदावा सिझन सध्या सुरू आहे. कार्यक्रमात हॉटसीटवर बसलेले स्पर्धक हे बिग बींना मजेशीर प्रश्न विचारताना दिसतात. केबीसीचा नुकताच पार पडलेला एपिसोड असाच मजेशीर आहे. यामध्ये एका स्पर्धकाने सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांना अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं बिग बींनीसुद्धा आपल्या अनोख्या अंदाजात दिली.
तुमच्या घरी कोणी जेवण बनवतं का आणि तुम्ही एकदा घातलेले कपडे पुन्हा रिपिट करता का, असे प्रश्न त्या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना विचारले. या प्रश्नांवर बिग बींनी दिलेली उत्तरं चांगलीच व्हायरल होत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये हॉटसीटवर पिंकी जावरानी ही स्पर्धक बसली होती. सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे.




“तुमच्या घरी जेवण बनवलं जातं का?”, असा प्रश्न पिंकी बिग बींना विचारतात. त्यावर बिग बी म्हणतात, “हो अर्थात, का नाही?” यानंतर त्या बिग बींना कपड्यांबद्दल प्रश्न विचारतात. तुम्ही एकदा घातलेले कपडे पुन्हा परिधान करता का, असा प्रश्न विचारतात. त्यावर उत्तर देताना बिग बी म्हणातात, “हो, मी माझे कपडे स्वत:च धुतो”.
“ही खूप चुकीची गोष्ट आहे. मी तुम्हा सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे असंच तुम्ही समजलात”, असं बिग बी पुढे म्हणतात. हे ऐकून पिंकी जोरात हसतात. “तुम्हाला काय वाटतं, आम्ही एकदाच कपडे घालून ते फेकून देतो का”, असंही अमिताभ बच्चन पुढे मस्करीत म्हणतात. हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.