KBC 14: ‘कौन बनेगा करोडपती’ला मिळाली पहिली विजेती; कोल्हापुरच्या महिलेनं जिंकले एक कोटी रुपये
करोडपती होण्याचं स्वप्न घेऊन देशभरातील स्पर्धक या शोमध्ये सहभागी होतात. एवढी मोठी रक्कम जिंकणं प्रत्येकाला शक्य नसलं तरी लाखोंमध्ये पैसे जिंकून अनेकांनी आपली स्वप्नं पूर्ण केली आहेत.
सोनी टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 14 व्या (KBC 14) सिझनचा पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या कविता चावला (Kavita Chawla) यांनी शोमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र कविता यांनी 7 कोटी रुपये जिंकले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता यांनी याआधीही कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) भाग घेतला होता. मात्र हॉटसीटवर बसण्याची संधी त्यांना मिळू शकली नव्हती. तरीही हार न मानता त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले.
45 वर्षीय कविता यांनी एक कोटी रुपये जिंकायचं ध्येय आपल्यासमोर ठेवलं होतं. या शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांच्या आत्मविश्वासाची खूप प्रशंसा केल्याचं बोललं जात आहे. मुलगा विवेकसोबत कविता या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांचा हा खास एपिसोड येत्या सोमवारी आणि मंगळवारी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
View this post on Instagram
गेल्या सिझनपासून कौन बनेगा करोडपतीच्या शोमध्ये महिलांचाच बोलबाला पहायला मिळतोय. गेल्या दोन सिझनमध्ये काही महिला करोडपती झाल्या. याचा आनंद अमिताभ बच्चन यांनीसुद्धा शेअर केला होता. करोडपती होण्याचं स्वप्न घेऊन देशभरातील स्पर्धक या शोमध्ये सहभागी होतात. एवढी मोठी रक्कम जिंकणं प्रत्येकाला शक्य नसलं तरी लाखोंमध्ये पैसे जिंकून अनेकांनी आपली स्वप्नं पूर्ण केली आहेत.
गेल्या सिझनमध्ये केबीसीच्या नियमांतर्गत एक कोटी जिंकल्यानंतर 7 कोटींच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिल्यास स्पर्धकांना फक्त 3 लाख रुपये मिळत होते. यामुळेच 7 कोटींच्या प्रश्नाला एकही स्पर्धक उत्तर देत नव्हता. मात्र आता या सिझनमध्ये 7 कोटींच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यास स्पर्धकांना 75 लाख रुपये मिळणार आहेत. निर्मात्यांना आशा आहे की यामुळे काही स्पर्धक तरी 7 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. मात्र या प्रश्नासाठी कोणतीही लाईफलाइन वापरण्याची परवानगी नाही.