KBC 15 | 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात जसकरण अपयशी; तुम्ही देऊ शकाल का?
अवघ्या 21 वर्षीय जसकरणने कौन बनेगा करोडपतीच्या पंधराव्या सिझनमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर त्याला देता आलं नाही. तो प्रश्न कोणता होता, ते जाणून घेऊयात..
मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : अमिताभ बच्चन यांचा सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चा पंधरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. प्रत्येक सिझनप्रमाणे या सिझनलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. या शोमध्ये विविध स्पर्धक सहभागी होऊन आपल्या ज्ञानाच्या जोरावर धनराशी जिंकतात. आजवर बरेच स्पर्धक एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले आणि त्यांनी हार मानली. मात्र यंदाच्या पंधराव्या सिझनचा पहिला करोडपती नुकताच समोर आला आहे. जसकरण सिंहने या सिझनमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यात राहणाऱ्या जसकरणने एक कोटी रुपयांची धनराशी आपल्या नावे केली आहे. मात्र 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात तो अपयशी ठरला.
जसकरण सिंहने डबल डीप लाइफलाईनचा वापर करत एक कोटी रुपयांची धनराशी जिंकली. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर तो खूपच भावूक झाला होता. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्याला मिठी मारत धीर दिला. त्यानंतर सूत्रसंचालक बिग बींनी त्याला सात कोटी रुपयांसाठी पुढचा आणि अखेरचा प्रश्न विचारला. जसकरण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र मात्र त्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही. हा प्रश्न कोणता होता, ते पाहुयात..
प्रश्न- पद्मपुराणानुसार, कोणत्या राजाला एका हरिणीच्या शापामुळे शंभर वर्षांपर्यंत वाघ बनून राहावं लागलं होतं?
पर्याय-
A- क्षेमधूर्ती B- धर्मदत्त C- मितध्वज D- प्रभंजन
या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन D- प्रभंजन. मात्र हे उत्तर माहीत नसल्याने जसकरण सात कोटी रुपये जिंकू शकला नाही. त्याला एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न कोणता होता, तेसुद्धा जाणून घेऊयात..
प्रश्न- जेव्हा भारताची राजधानी कोलकातावरून दिल्ली स्थानांतरित करण्यात आली होती, तेव्हा भारताचे व्हॉइसरॉय कोण होते?
पर्याय-
A- लॉर्ड कर्जन B- लॉर्ड हार्डिंज C- लॉर्ड मिंटो D- लॉर्ड रिडिंग
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन B- लॉर्ड हार्डिंज. हे योग्य उत्तर देऊन जसकरणने एक कोटी रुपये जिंकले होते. 21 वर्षांच्या जसकरणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की जिंकलेल्या रकमेतून तो सर्वांत आधी त्याच्या कुटुंबीयांसाठी घर खरेदी करणार आहे. त्याचसोबत उरलेल्या रकमेचा वापर तो त्याच्या युपीएससी कोचिंगसाठी वापरणार आहे.