KBC 15 | अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; ‘केबीसी’ला मिळाला दुसरा विजेता
कौन बनेगा करोडपतीच्या पंधराव्या सिझनला दुसरा करोडपती भेटला आहे. जसनिल कुमारने एक कोटी रुपये आपल्या नावे केले आहे. मात्र सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत असतानाही त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला.
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : कौन बनेगा करोडपतीचा पंधरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या सिझनचा दुसरा करोडपती नुकताच भेटला आहे. याआधी पंजाबच्या जसकरणने एक कोटी रुपये जिंकले होते. त्यानंतर आता उत्तरप्रदेशच्या जसनिल कुमारने एक कोटी रुपये आपल्या नावे केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जसनिलने एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देत धनराशी जिंकली आहे. मात्र जेव्हा सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने खेळ तिथेच थांबवला. मात्र खेळ सोडल्यानंतर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी जेव्हा त्याला उत्तराबद्दल अंदाज व्यक्त करण्यास सांगितलं. तेव्हा जसनिलने दिलेलं उत्तर योग्य ठरलं होतं.
एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न
प्रश्न- ‘कोणाद्वारे केलेल्या यज्ञानंतर उरलेल्या सोन्याचा उपयोग पांडवांनी आपल्या राजकोषाला पुन्हा एकदा भरण्यासाठी आणि अश्वमेध यज्ञ आयोजित करण्यासाठी केला होता?’ पर्याय- A- विकर्ण, B- मरुत्त, C- कुबेर, D- लिखित. या प्रश्नाचं अचूक उत्तर मरुत्त असं होतं आणि हे उत्तर देऊन जसनिलने एक कोटी रुपये जिंकले. त्यानंतर पुढे त्याला सात कोटी रुपयांचा प्रश्न विचारला जातो.
7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न
प्रश्न- भारतीय मूळची असलेली लीना गाडे ही यापैकी कोणती शर्यत जिंकणारी पहिली महिला रेस इंजीनिअर आहे? पर्याय- A- इंडिआनापोलीस 500, B- 24 अवर्स ऑफ ल मॉ, C- 12 अवर्, ऑफ सेब्रिंग, D- मोनॅको ग्रँड प्री.
या प्रश्नाचं अचूक उत्तर हे ऑप्शन ‘बी’ होतं. मात्र त्या उत्तराबद्दल खात्री नसल्याने जसनिलने शो सोडत एक कोटी रुपये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. याआधी पंजाबच्या जसकरणनेही एक कोटी रुपये जिंकल्यानंतर शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. पद्मपुराणानुसार, कोणत्या राजाला एका हरिणीच्या शापामुळे शंभर वर्षांपर्यंत वाघ बनून राहावं लागलं होतं, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे चार पर्याय – A- क्षेमधूर्ती B- धर्मदत्त C- मितध्वज D- प्रभंजन असे होते. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन D- प्रभंजन. मात्र हे उत्तर माहीत नसल्याने जसकरण सात कोटी रुपये जिंकू शकला नाही.