KBC 15 मध्ये 50 लाख रुपये जिंकल्यानंतर नोकरीतून ब्रेक घेणार शुभम गंगराडे; सांगितला फ्युचर प्लॅन
'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये अनेक स्पर्धक प्रचंड अपेक्षेने येतात. यामध्ये काहीजण त्यांची स्वप्नं पूर्ण करू शकतात, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहींचे प्रयत्न अपुरे पडतात. इंदौरच्या शुभमने या शोमध्ये नुकतेच 50 लाख रुपये जिंकले आहेत.
मुंबई | 15 सप्टेंबर 2023 : कौन बनेगा करोडपतीचा पंधरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये इंदौरमधल्या शुभम गंगराडे हा स्पर्धक एक कोटी रुपये जिंकू शकला नाही. मात्र त्याने 50 लाख रुपये आपल्या नावे केले आहेत. घरातील आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने शुभमने कमी वयातच शिक्षणातून काही काळासाठी ब्रेक घेतला आणि टेलीकॉम कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र आता केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकल्यानंतर तो नोकरीतून ब्रेक घेणार आहे. ब्रेक घेऊन शुभम त्याचं शिक्षण पूर्ण करणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभमने त्याचा फ्युचर प्लॅन सांगितला.
शुभम म्हणाला, “काही काळ अभ्यासातून ब्रेक घेऊन मी नोकरी करू लागलो होतो. नोकरी करतानाही मी सोबत अभ्याससुद्धा करत होतो. मात्र नोकरी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकत्र करणं म्हणजे तारेवरची कसरतच होती. आता केबीसीमध्ये चांगली रक्कम जिंकल्यानंतर मी कामातून ब्रेक घेणार आहे. मला एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे, कारण मला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे. मी पॉलिटिकल सायन्समधून शिक्षण घेतोय.”
50 लाख रुपये जिंकण्यापर्यंतचा शुभमचा प्रवास काही सोपा नव्हता. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत केली. सकाळी 5.30 ते 9 वाजेपर्यंत तो कार धुण्याचं काम करायचा. त्यानंतर तो टेलीकॉम कंपनीतील नोकरीसाठी जायचा. केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चनसुद्धा शुभमचा इथपर्यंतचा प्रवास पाहून भावूक झाले होते. प्रश्नोत्तरांदरम्यान गप्पा मारत असताना बिग बींनी शुभमला विचारलं की त्याला घर घेण्यासाठी किती रक्कम हवी आहे? त्यावर उत्तर देताना शुभमने सांगितलं की, त्याने जे घर पाहिलं आहे, ते जवळपास 25 लाख रुपयांपर्यंत आहे. जेव्हा शुभमने 50 लाख रुपये जिंकले, तेव्हा त्याच्यासोबतच अमिताभ बच्चन यांनीसुद्धा आनंद व्यक्त केला. त्यांनी उभं राहून शुभमसाठी टाळ्या वाजवल्या आणि त्याचं कौतुक केलं. “आता तो एक नाही तर दोन घरं घेऊ शकतोस”, असं ते शुभमला म्हणाले.