महाराष्ट्रात ‘द केरळ स्टोरी’ मोफत दाखवणाऱ्यांवर भडकले केदार शिंदे; शाहीर साबळेंविषयी केला सवाल
केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास 3.33 कोटी रुपयांची कमाई केली. तर 5 मे रोजी सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून आधीच खूप मोठा वाद सुरू होता. आता ‘द केरळ स्टोरी’वरून केदार शिंदे हे महाराष्ट्रातील नेत्यांवर भडकले आहेत. यासंदर्भात त्यांनी केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
केदार शिंदे यांचं ट्विट-
‘दुर्दैव… महाराष्ट्रात ‘केरला स्टोरी’ या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का,’ असा सवाल त्यांनी केला आहे.
दुर्दैव… महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? pic.twitter.com/s4cup46lns
— Kedar Shinde ?? (@mekedarshinde) May 7, 2023
नेत्यांकडून ‘द केरळ स्टोरी’च्या स्क्रिनिंगचं आयोजन
केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर लखनौमध्ये नवयुग कन्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजच्या 100 विद्यार्थिनींसाठी भाजप नेते अभिजात मिश्रा यांनी ‘द केरळ स्टोरी’च्या स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. लखनौमधील एका सिनेमा हॉलमध्ये 100 विद्यार्थिनींना हा चित्रपट दाखवण्यात आला होता.
शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर चित्रपट
लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेलेल्या कृष्णराव अर्थात शाहीर साबळे यांनी 1942 ची चले जाव, स्वातंत्र्यानंतरचा गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र अशा चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. लोककलेच्या क्षेत्रातील मोलाच्या योगदानबद्दल या महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.