मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : कन्नड अभिनेता यशच्या ‘केजीएफ : चाप्टर 1’ आणि ‘केजीएफ : चाप्टर 2’ या दोन चित्रपटांच्या तुफान यशानंतर आता प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाचे पहिले दोन भाग ब्लॉकबस्टर ठरले. आता ‘केजीएफ 3’बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. होंबाळे फिल्म्सकरून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. ‘केजीएफ 2’चा शेवट अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर झाला होता. याच चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये तिसऱ्या भागाची हिंट देण्यात आली होती. तेव्हापासून प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची घोषणा कधी होईल, याची प्रतीक्षा होती. अखेर त्याबद्दलची अपडेट आता समोर आली आहे.
‘केजीएफ 3’च्या प्रदर्शनासाठी होंबाळे फिल्म्स 2025 या वर्षाचा विचार करत असल्याचं कळतंय. “प्रशांत नील यांचा केजीएफ 3 हा चित्रपट 2025 या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. तर याबद्दलची अधिकृत घोषणा निर्मात्यांकडून डिसेंबरपर्यंत करण्यात येईल. त्याचप्रमाणे अभिनेता यश या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला पुढच्या वर्षाच्या अखेरीस सुरुवात करू शकतो”, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रशांत नील यांच्या केजीएफ या चित्रपटात रॉकी भाईची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेता यशने ही मुख्य भूमिका साकारली आहे. ‘केजीएफ 2’मध्ये यशसोबतच संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांच्याही भूमिका होत्या. त्याचसोबत मालविका अविनाश, प्रकाश राज, ईश्वरी राव आणि सरन यांच्या सहाय्यक भूमिका होत्या.
‘केजीएफ चाप्टर 2’ हा गेल्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. कमाईचे नवे विक्रम या कन्नड चित्रपटाने रचले होते. केवळ कन्नड भाषेतच नाही तर हिंदीतही केजीएफ 2 ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. केजीएफ- चाप्टर 2 चा क्लायमॅक्स हा प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण करतो. अधिरा आणि रॉकी (संजय दत्त आणि यश) यांच्यातील वैर संपलं का, रीनाचा खरंच मृत्यू झाला का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात.
यशच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तो नितेश तिवारी यांच्या रामायणावरील आधारित चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी त्याने विविध लूक टेस्टसुद्धा दिले आहेत. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.