अवघ्या पाच दिवसांत कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF chapter 2) या चित्रपटातील मुख्य अभिनेता यशचे (Yash) हिंदी डायलॉग्स कोणी डब केले माहितीये का? गेल्या 14 वर्षांपासून आवाजाच्या दुनियेत संघर्ष करणाऱ्या सचिन गोळे (Sachin Gole) याने ‘रॉकी’ म्हणजेच यशचे संवाद हिंदीत डब केले आहेत. केजीएफ 2च्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत 219.56 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना सध्या हिंदीतही प्रचंड यश मिळतंय. याचं बरंचसं श्रेय डबिंग आर्टिस्ट्सनाही द्यावं लागेल. कारण जर आवाज ताकदीचा नसेल आणि डबिंग व्यवस्थित झाली नाही तर त्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळत नाही. आजवर ‘बाहुबली 2’मध्ये प्रभासला अभिनेता शरद केळकरने तर ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनला अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला आहे. हे दोन्ही कलाविश्वातील लोकप्रिय चेहरे आहेत. मात्र रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या ‘केजीएफ 2’मध्ये यशला आवाज देणारा सचिन गोळे फारच क्वचित लोकांना माहित असेल.
डबिंग इंडस्ट्रीत सचिन गेल्या 14 वर्षांपासून काम करतोय. 2008 मध्ये त्याने करिअरची सुरुवात केली. “मुंबईत मी अभिनेता होण्यासाठी आलो होतो. माझ्या कुटुंबीयांनीही माझी खूप साथ दिली. मात्र मुंबईत आल्यानंतर माझा खरा संघर्ष सुरू झाला. मला काम मिळत नव्हतं, राहायला पैसे नव्हते. अशातच माझा मित्र अनिल म्हात्रे याने माझी ओळख डबिंग विश्वाशी करून दिली. त्यांच्यासोबत मिळून मी नाटकासाठी काम करायचो. हळूहळू मला डबिंग इंडस्ट्रीतील बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. यादरम्यान मी बँकेतही नोकरी करत होतो. होम लोनच्या कामासाठी फिल्डवर जावं लागत होतं. मात्र मी फक्त हजेरी लावून साऊंड स्टुडिओमध्ये येऊन बसायचो”, असं सचिनने ‘अमर उजाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
“एकेदिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल समजलं, तेव्हा ते म्हणाले की जे काम करायचं आहे, ते मनापासून कर. तेव्हाच मी निर्णय घेतला की काहीही करून डबिंग इंडस्ट्रीत जम बसवायचा. सहा-सात महिन्यांत काहीच करू शकलो नाही तर गावी परत जाईन असा निश्चय केला होता. डबिंगची छोटी-मोठी कामं मला मिळायला लागली. माझ्या उच्चारांवर मी खूप मेहनत घेतली. भाषेवर प्रभुत्व मिळवलं. एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी मी अभिनेता धनुषला माझा आवाज दिला होता. तिथून खरी सुरुवात झाली. हळूहळू धनुषच्या इतरही चित्रपटांसाठी मी डबिंग करू लागलो. त्याच्या ‘मारी’ या चित्रपटातील माझ्या डबिंगचं खूप कौतुक झालं”, असं त्याने पुढे सांगितलं.
सचिन गोळेनं यशच्या आधीच्या चित्रपटांसाठीही हिंदी डबिंग केलं आहे. त्यामुळे केजीएफ 2 हा टर्निंग पॉईंट नसला तरी करिअरमधील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची भावना त्याने व्यक्त केली. केजीएफ 2ची इतरही डबिंग आर्टिस्ट्सचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. मात्र यशला सचिनचा आवाज खूप आवडला. केजीएफ 2 मुळे संघर्षाचा 14 वर्षांचा वनवास संपल्याचं सचिन गोळेनं या मुलाखतीत म्हटलं.