Pathaan | ‘पठाण’च्या यशानंतर KGF निर्मात्यांनी शाहरुख खानला दिली मोठ्या चित्रपटाची ऑफर?
25 जानेवारी रोजी 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून दरदिवशी हा बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम करताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांत या चित्रपटाने भारतात तब्बल 348.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुंबई: सध्या फिल्म इंडस्ट्रीत शाहरुख खानच्या पठाण याच चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करताना दिसत नाहीत. अशातच पठाण बॉलिवूडसाठी नवसंजीवनी ठरला आहे. पठाणचं हेच यश पाहून आता ब्लॉकबस्टक केजीएफच्या निर्मात्यांनी शाहरुखला मोठी ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.
25 जानेवारी रोजी ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हापासून दरदिवशी हा बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम करताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांत या चित्रपटाने भारतात तब्बल 348.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 634 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पठाणचं हे यश पाहिल्यानंतर आता केजीएफच्या निर्मात्यांनाही शाहरुखसोबत काम करायचं आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चा पूर्णपणे खऱ्या नाहीत.
एका मुलाखतीदरम्यान या चर्चांवर बोलताना होम्बाले फिल्म्स कंपनीचे मालक विजय किर्गंदूर म्हणाले की सध्या तरी असा कोणता प्लॅन नाही. हिंदी चित्रपटासाठी आमचं शाहरुखसोबत काही बोलणं झालं नाही. किंवा त्याच्या सहाय्यकांनी आमच्याशी काही बातचित केली नाही. विजय यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांना एखाद्या हिंदी चित्रपटासाठी चांगली कथा मिळत नाही, तोपर्यंत ते त्याबद्दल विचार करणार नाहीत.
आणखी एका मुलाखतीत विजय यांना प्रश्न विचारला गेला की पठाणच्या यशाचा साऊथच्या चित्रपटांवर काय परिणाम होईल? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मला नाही वाटत की त्यामुळे काही परिणाम होईल. साऊथ असो किंवा नॉर्थ.. पठाणचं यश हे निर्मात्यांना आणखी चांगले चित्रपट बनवण्यास प्रेरणा नक्की देईल. हे बॉलिवूड आणि साऊथ दोघांसाठी चांगलं आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आता थिएटरकडे वळत आहेत.”
केजीएफ 2 च्या यशानंतर निर्माते ‘सालार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. तर दुसरीकडे शाहरुखचे ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.